आरे वाचवा! विद्यार्थ्यांचे सरन्यायाधीशांना पत्र, सुप्रीम कोर्टाने घेतली दखल

460

मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये झाडांची अमानुष कत्तल सुरू आहे. मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ आणि पोलीस कुणालाही दाद देत नाहीत. याप्रश्नी आपणच हस्तक्षेप करावा अशी विनंती कायद्याचे शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांनी थेट सरन्यायाधीशांना एका पत्राद्वारे केली. त्याची तातडीने दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने उद्या सोमवारी यावर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या मुंबईतील विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना आज सकाळी हे पत्र पाठवले. लोकांचा विरोध असतानाही आरेमधील झाडे तोडली जात आहेत. विरोध करणाऱयांनाच नव्हे तर आरेमध्ये आसपास भटकणाऱयांनाही जबरदस्तीने अटक करून त्यांच्यावर गुन्हे टाकले जात आहेत अशी वस्तुस्थिती त्यात मांडली गेली. याची आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने दखल घ्यावी आणि या वृक्षतोडीला स्थगिती देण्याचे आदेश देण्यात यावेत अशी कळकळीची विनंती त्या पत्रात करण्यात आली. आता उद्या याप्रकरणी होणाऱया सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आंदोलनकर्त्यांना जामीन
आरेतील मेट्रो कारशेडला विरोध करणाऱया 29 जणांना पोलिसांनी काल अटक करून 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. दिंडोशीच्या सुट्टीकालीन न्यायालयात आज त्यांना हजर केले असता न्यायालयाने सर्वांना जामीन मंजूर केला. आरे जंगल नसल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने दाखल केलेल्या चार याचिका शुक्रवारी फेटाळल्यानंतर ‘एमएमआरसीएल’ने झाडे कापण्याचा सपाटा सुरू केला आहे. याची माहिती मिळताच आरेकडे पर्यावरणप्रेमींची रिघ लागली असून झाडे कापण्याला विरोध करत ‘आरे वाचवा’ आंदोलन आणखी तीक्र केले आहे. दरम्यान, पोलिसांनी जमावबंदी लागू केली असून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले जात आहे.

झाडांना वाचवणे गुन्हा असेल तर शाळांमध्ये पर्यावरणाचे धडे का देता? ‘आरे’च्या आंदोलनकर्त्यांचा संतप्त सवाल
शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे धडे दिले जातात तर दुसरीकडे आरे वाचवण्यासाठी आंदोलन करणाऱया पर्यावरणप्रेमींना सरकारने तुरुंगात डांबले. झाडांना वाचवणे गुन्हा असेल तर मग शालेय शिक्षणात पर्यावरण संवर्धनाचे धडे का देता, असा संतप्त सवाल आरेच्या आंदोलनकर्त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

आरेतील प्रस्तावित ‘मेट्रो-3’ कारशेडसाठी शुकवारी रातोरात झाडे कापण्यास सुरुवात झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या पर्यावरणप्रेमींनी आंदोलन केले. पोलिसांनी शुक्रवारी रात्री 26 पुरुष आणि 3 महिला अशा 29 आंदोलनकर्त्यांना अटक केली होती. यात काही विद्यार्थ्यांचादेखील समावेश आहे. या आंदोलनकर्त्यांविरोधात कलम 353, 332, 141, 142 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. 353 अंतर्गत गुन्हा नोंदवल्याने या मुलांचे आयुष्यच उद्ध्वस्त होईल अशी भीती पालकांनी व्यक्त केली आहे.

झाडे जगवणे गुन्हा आहे का?
आरे येथील स्थानिक रहिवासी प्रकाश भोईर यांच्या पत्नीलाही अटक करण्यात आली आहे. याचा निषेध करताना ते म्हणाले, आमच्या आदिवासींसाठी निसर्ग हे दैवत आहे. आम्ही रात्री झाडांची पानेदेखील तोडत नाही. वाघांचीही पूजा करण्याची आमच्याकडे प्रथा आहे. पण मेट्रो कारशेडसाठी रातोरात झाडे कापण्यात आली. इतकी घाई कशासाठी केली?

परीक्षेलादेखील जाऊ दिले नाही
जिवाचा पाडा येथे राहणारी टीवायबीएमएममध्ये शिक्षण घेणाऱया एका तरुणीला पोलिसांनी दोन वेळा पकडले. ती परीक्षेला निघाली होती. हॉल तिकीट दाखवूनदेखील पोलीस तिला परीक्षेला जाऊ देत नव्हते. अखेर कॉलेजच्या प्राध्यापकांनी फोन केल्यानंतर तिला परीक्षेला पोलिसांनी सोडल्याचे तिने सांगितले.

याप्रकरणी अटक केलेल्या नेल्सन लोपेझ याच्या आई हेलन लोपेझ म्हणाल्या, माझ्या मुलाला पर्यावरणाची खूप आवड आहे. आरे बचावसाठी आवाज उठवला म्हणून आज तोच तुरुंगात आहे. पर्यावरणप्रेमींनाच अशी वागणूक मिळाली तर भविष्यात पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कुणीच पुढे येणार नाही.

ऍमेझॉनच्या वणव्याचे मुंबई पोलिसांना चटके, ‘त्या’ ट्विटमुळे पर्यावरणप्रेमी संतापले
मेट्रो कारशेडसाठी शुक्रवारी रात्री आरे कॉलनीतील हजारो झाडांची कत्तल करण्यात आली. या घटनेचा निषेध करणाऱया 29 पर्यावरणप्रेमींना अटक करून आंदोलन दडपणाऱया मुंबई पोलिसांविरोधात सर्वत्र संतापाची लाट आहे. अशातच मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी केलेले एक ट्विट त्यांच्या चांगलेच अंगाशी आले आहे. हे ट्विट होते ‘सेव्ह ऍमेझॉन’बद्दलचे! यावरून मुंबई पोलिसांना ऍमेझॉन महत्त्वाचे वाटते, आरेचे जंगल वाटत नाही का? असे विचारत नेटिजन्सनी मुंबई पोलिसांना धारेवर धरले आहे.

28 ऑगस्ट रोजी मुंबई पोलिसांनी एक ट्विट केले होते. ‘ऍमेझॉनच्या जंगलातील वणवा म्हणजे संपूर्ण मानवजातीचे नुकसान आहे. म्हणूनच आपण सर्वांनी एकत्र येऊन झाडांचे, वन्य जीवांचे रक्षण करण्याचा निर्धार केला पाहिजे. त्यांचे रक्षण आपल्याशिवाय कोण करणार? आता नाही, तर कधीच नाही. सेव्ह ऍमेझॉन, सेव्ह मदर अर्थ.’ मुंबई पोलिसांच्या या ट्विटवरून आता त्यांच्यावर टीका होत आहे. 14 हजार 831 किमी अंतरावर असलेल्या ऍमेझॉनच्या जंगलाचे तुम्हाला महत्त्व वाटते. आरेतील झाडांचे वाटत नाही का? असा सवाल ट्विटरच्या माध्यमातून विचारला जात आहे. ‘मुंबईत बसून ऍमेझॉनचे काहीही करू शकत नाही. आधी आरेच्या जंगलाचे बघा’, असे टोले सोशल मीडियावरून लगावले जात आहेत. ‘मुंबई पोलिसांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दिलेली निर्दयतेची वागणूक कधीच विसरता येणार नाही. आमचा तुमच्यावरील विश्वास उडाला. महाराष्ट्र वृक्ष संरक्षण कायदा 1975 अन्वये झाडांचे रक्षण करणे ही मुंबई पोलिसांची जबाबदारी आहे. जे निसर्ग वाचवत आहेत त्यांनाच तुम्ही अटक करीत आहात’, असे ट्विटही करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या