बचतीचा कानमंत्र

632

आज बचतीची संकल्पना केवळ मोठय़ा माणसांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. विद्यार्थ्यांनाही बचतीचे महत्त्व कळू लागले आहे.

पैशाची बचत करणे ही काळाची गरज बनली आहे. पैशांची किंमत सगळ्यांनाच कळू लागली आहे. म्हणूनच तरुणपिढीही आता पैशांच्या बचतीबाबत सजग झालीय… शिकतानाच  ते पैशांची बचतही करत आहेत. त्यांच्याकडूनच जाणून घेऊया अशी बचत कशी करायची ते…

 • कष्टाचे पैसे जपून वापरतो

माझे आई-वडिल दोघंही कष्ट करुन आम्हा भावंडांचे शिक्षण पूर्ण करताहेत. मला त्यांच्या कष्टाची जाण आहे. सुट्टीच्या दिवसांमध्ये मिळेल ते काम करतो. त्यामुळे बऱयाच नवीन गोष्टी शिकायला मिळतात. बोलण्याचे कौशल्य सुधारते. ज्ञानात भर पडते. नवीन लोकांच्या ओळखी होतात, चौकसपणा वाढतो. मी जेव्हा जेव्हा काम केलंय, त्यातून मला दरवेळी नव्या गोष्टी शिकता आल्या. त्याचा मला खूप फायदा झाला. जमा झालेल्या पैशांमधून कॉलेजची पुस्तके खरेदी करतो. बसचा पास काढतो. उरलेले पैसे बँकेच्या खात्यात जमा करतो आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपले कष्टाचे पैसे खूप जपून वापरतो.

आदित्य अशोक खर्डे, तोलानी महाविद्यालय, अंधेरी

 • खात्यात जमा करते

मला आई-बाबांकडून जे खर्चाला पैसे मिळतात ते सगळेच नोट्ससाठी खर्च होत नाहीत. काही रक्कम शिल्लक राहते. पैसे हवे तेथेच खर्च करण्याची शिस्तच घरातून लावली आहे. त्यामुळे पैसे आवश्यक ठिकाणीच खर्च करते. आई-बाबांनी मला बँकेत माझं खातं उघडून दिलंय. दर दोन महिन्यातून एकदा मी त्यात एक हजार रूपये जमा करते. मला त्याचा खूप अभिमान वाटतो. आपल्या हक्काचे पैसे बचत केल्याचा आनंद वेगळाच असतो हे कळलंय. कधी एकदम गरज वाटल्यास मी एटीएममधून पैसे काढते. पण मी पैशांचे नियोजन योग्यप्रकारे करते. रक्षाबंधन, भाऊबीज, दिवाळी अशा सणांना मिळालेले पैसेही मी बचत करते.

प्राची विलास गावडे, एन. ई. एस. रत्नम कॉलेज, भांडूप

 • शिकता शिकता गुंतवणूक

मला क्रिकेटची आणि ट्रेकिंगची प्रचंड आवड आहे. त्यासाठी काहीही खर्च झाला तरी बेहत्तर… पण त्यासाठी मी माझ्या आईबाबांना त्रास देत नाही. माझ्या खर्चासाठी मी इव्हेंट आयोजित करणाऱया कंपन्यांना मदत करतो. त्यातून मिळणारी रक्कम माझ्या खर्चासाठी वापरतो. राहिलेले पैसे एकतर बँकेत टाकतो किंवा शेअर्समध्ये गुंतवतो. पुढेमागे कधीतरी या शेअर्सच्या दरात वाढ होईल तेव्हा मला फायदा होईलच. पण सध्या तरी माझ्याकडची रक्कम खर्च न होता कुठेतरी गुंतवल्याचा मला आनंद होतो. नुसते पैसे कमावणे हा माझा कधीच हेतू नसतो. शिकता शिकता मी गुंतवणूक करतो. यामुळे माझी आवड जोपासली जाते आणि कुणावर अवलंबूनही राहावे लागत नाही. बचत महत्त्वाचीच!

केदार सकपाळ, एम. एल. डहाणूकर कॉलेज, विलेपार्ले

……..

हेही लक्षात ठेवा

 • नवीन कोरी पुस्तके घेण्यापेक्षा जुनी पुस्तके घेतली, त्यांना छान कव्हर घातले की तेवढे पैसे वाचतात.
 • जंक फूड खाण्यापेक्षा घरातले पदार्थ खाल्लेले केव्हाही चांगले.
 • दोन-तीन महिन्यातून एकदा बाहेर जेवायला हरकत नाही, पण दर आठवडय़ाला ते टाळाच.
 • बाहेर फिरताना ट्रेन, बसचा वापर करा.
 • मोबाईल फोन वापरताना कॉल्स, एसएमएस फ्री असलेले पॅकेजबाबत अपडेट राहा.
 • विद्यार्थ्यांसाठी सूट असलेल्या ठिकाणीच खरेदी करा.
 • एखाद्या बँकेत खाते उघडा.
 • विद्यार्थ्यांनी ब्रॅण्ड बघून वस्तू खरेदी करणे सोडून द्यायला हवे.
 • जे खावेसे वाटतं ते घरी बनवा.
 • मोकळा वेळ असेल तर पार्टटाईम नोकरी करा, त्यातून नवीन गोष्टी शिकता येतील.
 • दिवसाला आपण किती आणि काय खर्च केला याची नोंद ठेवा. त्यामुळे खर्चावर नियंत्रण राहील.
आपली प्रतिक्रिया द्या