‘सविता भाभी’ वरून ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’वाल्यांना नोटीस

8938
फोटो सौजन्य- झी म्युझिक कं, युट्यूब चॅनेल

‘सविता भाभी’ हे नाव अश्लील मजकूर वाचणाऱ्यांना आणि माहिती असणाऱ्यांना परिचित आहे. या नावाने कॉमिक्स पुस्तकात एक अश्लील पात्र असून त्या पात्रावर आपला कॉपीराईट हक्क असल्याचे सांगणारे चित्रपट निर्माते नितीन कुमार गुप्ता सध्या भडकलेले आहेत. ‘सविता भाभी’ या ब्रँडचा गैरवापर केल्याने त्यांनी वकिलांतर्फे एक नोटीस धाडली आहे.

‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ नावाचा एक मराठी चित्रपट येत आहे. या चित्रपटामध्ये सविता भाभी’ नावाचं पात्र दाखवण्यात येत आहे. या पात्राच्या आणि चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी पुण्यामध्ये ‘सविता भाभी तू इथेच थांब!!’ असे होर्डींग्ज लागले होते. गुप्ता यांनी या पात्राचे सगळ कॉपीराईट आणि ट्रेडमार्क आपल्याकडे असल्याचे म्हणत मराठी चित्रपटाच्या निर्मात्याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये म्हटले आहे की ‘सविताभाभी’ या पात्राचे सगळे अधिकार गुप्ता यांच्याकडे असून त्यांच्या परवानगीशिवाय या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने या नावाचा वापर केला आहे आणि हे कॉपीराईट आणि ट्रेडमार्क कायद्याचे उल्लंघन आहे.

गुप्ता यांनी नोटीसद्वारे या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना ‘सविता भाभी’ नावाचा वापर थांबवण्यास सांगितलं आहे. या नावाचा वापर करून केलेली कोणतीही प्रसिद्धी किंवा जाहिरात थांबवा असंही दिग्दर्शकाला सांगण्यात आलं आहे. याशिवाय या नावाचा गैरवापर केल्याबद्दल गुप्ता यांनी 50 लाखांची नुकसानभरपाई देखील मागितली आहे. ही नोटीस राजश्री प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड, राजश्री इंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि RRP कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड यांना देखील पाठवण्यात आल्याचे एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. जर नोटीस मिळाल्याच्या 3 दिवसांत हे नाव वापरणं थांबवलं नाही आणि प्रसिद्धीसाठीचे फलक किंवा इतर गोष्टी मागे घेतल्या गेल्या नाहीत तर 20 कोटी रुपयांची नुकसानभरपाईची मागणी करण्यात येईल.

पुणे मिरर या वर्तमानपत्राने याबाबतचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे.अश्लील उद्योग मित्र मंडळाच्या बाजूने उभे असलेले वकील असीम सरोदे यांनी या चित्रपटासाठीची आवश्यक ती सगळी परवानगी घेण्यात आलेली आहे. ही परवानगी कॅनडास्थित माणसाकडून घेण्यात आलेली असून त्याने सगळे अधिकार आपल्याला दिल्याचंही सरोदे यांनी म्हटले आहे असे वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. गुप्ता यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटीसलाही उत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले. हा चित्रपट 6 मार्च 2020 ला प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या