एसबीआय कर्मचारी कपात करण्याची शक्यता

13

सामना ऑनलाईन । मुंबई

एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. एसबीआय आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल २७ हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीच्या विचारात आहे. एसबीआयमध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या सहा बँकांचं विलीनीकरण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात येणार आहे.

एसबीआयमध्ये स्टेट बँक ऑफ जयपूर, स्टेट बँक ऑफ बिकानेर, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ हैदराबाद आणि भारतीय महिला बँक या बँकांचं विलीनीकरण होत आहे. त्यामुळे एसबीआयच्या कर्मचारी संख्येत तब्बल ७० हजार कर्मचाऱ्यांची भर पडून एकूण कर्मचारी संख्या २ लाख ७७ हजार इतकी होईल.

डीजिटलीकरणामुळे मानवी कार्य कमी होणार असून येत्या दोन वर्षांत आमच्या कर्मचारी संख्येत १० टक्क्यांपर्यंत कपात होऊ शकते, असं एसबीआयचे महाव्यवस्थापक रजनीश कुमार यांनी सांगितलं आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा पर्यायही देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यानुसार तब्बल २७ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या