राजकारण सोडा, ‘कुनो’ नॅशनल पार्कमधील चित्त्यांना राजस्थानात ठेवण्याचा विचार करा

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधील तीन आफ्रिकन चित्त्यांच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. चित्त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन न्यायालयाने केंद्र सरकारला राजकारणापलीकडे जाऊन या चित्त्यांना राजस्थानला हलवण्याचा विचार करा, असे निर्देश दिले आहेत. तसेच न्यायालयाने वन्यजीव तज्ञ समितीला 15 दिवसांत चित्ता टास्क फोर्सला उपाय सुचवण्याच्या सूचनादेखील केल्या आहेत.

न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि संजय करोल यांच्या खंडपीठाने याप्रकरणी सुनावणी करताना सांगितले की,  कुनोमध्ये चित्त्यांच्या मोठय़ा लोकसंख्येसाठी पुरेशी जागा आणि संसाधने नसल्याचे तज्ञांच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने चित्त्यांना दुसऱ्या उद्यानात किंवा अभयारण्यात हलवण्याचा विचार करावा.

  • भोपाळमध्ये मुख्य सचिव इक्बाल सिंग बैंस यांनी गुरुवारी चित्ता प्रकल्पाचा आढावा घेतला. त्यांनी मंदसौरचा गांधी सागर आणि सागरचा नौरादेही चित्त्यांसाठी त्वरित तयार करण्याच्या सूचना दिल्या.
  • कुनोमध्ये 2 मादी चित्ता गरोदर असून जूनमध्ये त्यांची डिलिव्हरी होऊ शकते. त्यांना लहान पिलांसह मोठय़ा आवारात ठेवावे लागेल. यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे.

केंद्र सरकार चित्त्यांना राजस्थानात का नेत नाही?

चित्त्यांसाठी केंद्र सरकार राजस्थानात जागा का शोधत नाही, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला. तसेच राजस्थानात विरोधी पक्षाचे सरकार असल्याने केंद्र सरकार तेथे चित्त्यांची रवानगी करीत नाही का, असेही विचारले. केंद्राच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी न्यायालयाला सांगितले की, चित्ता टास्क पर्ह्स मृत्यूचे कारण आणि या चित्त्यांना दुसऱ्या प्रदेशात हलवण्याच्या पैलूंचा तपास करीत आहे.