महिला नको पुरुष कर्मचारी हवेत, न्यायाधीशांकडून मागणी

90

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर एका महिला कर्मचाऱ्याने लैंगिक छळाचा आरोप केल्याने सगळ्याच न्यायाधीशांना जबर धक्का बसला आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी त्यांच्या घरात असलेल्या कार्यालयासाठी महिला कर्मचाऱ्यांऐवजी पुरुष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे. दरम्यान लैंगिक छळाचा आरोप असलेले सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची भेट घेतली होती. यावेळी गोगोई यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबद्दल व त्यामुळे झालेल्या मनस्तापाबद्दल उपस्थित न्यायाधीशांना अवगत केले. हा आरोप म्हणजे आपल्याविरोधातील कटकारस्थान असल्याचे ते यावेळी म्हणाले. त्यानंतर सर्वच न्यायाधीशांनी त्यांच्या मागे ठाम उभे असल्याचे सांगितले.

ही बैठक जवळजवळ 20 मिनिटे सुरू होती. यावेळी अनेक न्यायाधीशांनी घरातील कार्यालयासाठी फक्त पुरुष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी गोगोई यांच्याकडे केल्याचे त्यांनी स्वत: सांगितले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात 60 टक्के महिला कर्मचारी असल्याने फक्त पुरुष कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे कठीण असल्याचे गोगोई यांनी म्हटले आहे.

या बैठकीत रात्री उशिरापर्यंत महिला कारकूनांकडून काम करून घेण्यास भीती वाटत असल्याचे अनेक न्यायाधीशांनी गोगोई यांना सांगितले. बऱ्याचवेळा एखाद्या केसचा सारांश किंवा इतर गोष्टी करण्यास उशीर होतो. अशावेळी कर्मचारी महिला असल्याने त्यांच्याबरोबर मोकळेपणाने काम करणे कठीण जाते, असेही न्यायाधीशांनी गोगोई यांना सांगितले. दरम्यान यावेळी सरन्यायाधीशांनी सांगितले की भविष्यात अशीच घटना कुणा सरन्यायाधीशासोबत होऊ नये यासाठी या प्रकरणावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

दरम्यान, एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक न्यायाधीशांनी त्या महिलेने केलेल्या आरोपांवर आपली मते व्यक्त केली आहेत. सरन्यायाधीशांनी शपथ ग्रहण सोहळ्यात फक्त आपल्याला व पतीला आमंत्रण दिले होते. तसेच दुपारचे जेवणही करायचे असा गोगोई यांनी आग्रह केला होता, असे महिलेने सांगितले होते. पण प्रत्यक्षात गोगोई यांनी सगळ्याच स्टाफला आमंत्रित केले होते. असे असताना गोगोई यांनी फक्त तिलाच बोलावले होते व त्यांनी तिच्याशी जवळीक केल्याचा आरोप महिला कसा काय करू शकते असा सवालही इतर न्यायधीशांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या