सरन्यायाधीशांसोबत ‘चाय पे चर्चा’नंतर न्यायमूर्तींचे बंड अखेर शमले

10

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायमूर्तींनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात शुक्रवारी केलेल्या बंडाचे न्यायालयाच्या कामकाजावर सोमवारी कोणते पडसाद उमटतात, याकडे अख्ख्या देशाचे लक्ष लागले होते. मात्र न्यायमूर्तींचे बंड अखेर शमले.

आज सकाळी सरन्यायाधीशांसोबत ‘चाय पे चर्चा’ करून चारही न्यायमूर्ती कामावर रुजू झाले. चहापानावेळी झालेल्या चर्चेत ‘बंडखोर’ न्यायमूर्तींनी वादाला पूर्णविराम दिला, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या बार कौन्सिलचे अध्यक्ष मनन मिश्रा यांनी दिली. न्यायमूर्तींमधील वाद मिटला आहे, असा दावा अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनीही केला. न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांविरोधात मीडियासमोर जाऊन ‘आवाज’ उठवण्याची घटना पहिल्यांदाच घडली होती. त्यामुळे देशभरात खळबळ माजली होती. तसेच सरकारचीही चांगलीच धांदल उडाली होती.

सरन्यायाधीश हे महत्त्वाची प्रकरणे वरिष्ठ न्यायमूर्तींना डावलून कनिष्ठ न्यायमूर्तींकडे सोपवतात, असा आरोप त्या चार न्यायमूर्तींनी केला होता. त्याला सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती दिवंगत बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचाही संदर्भ होता. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लगेचच लोया मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे न्यायमूर्तींच्या बंडाला वेगळीच धार चढली होती. त्या बंडाने न्यायपालिका चांगलीच हादरली होती. त्यानंतर बार कौन्सिल ऑफ इंडिया आणि सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन या वकिलांच्या दोन संघटनांनी गेले दोन दिवस न्यायमूर्तींमधील वाद मिटवण्यासाठी नेटाने प्रयत्न केले होते. त्याला यश आल्याचे चित्र सोमवारी दिसले.

आपली प्रतिक्रिया द्या