80 टक्के लोकं मास्क वापरत नाहीत; सर्वोच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त

supreme_court_295

देशभरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना, नियमावली जारी केली आहे. मात्र, जनतेमध्येच नियम पाळण्याबाबत अनास्था दिसून येत असल्याने कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. सुमारे 80 टक्के लोकं मास्क वापरत नसल्याचे दिसून आले आहे. हे चिंताजनक असल्याचे सांगत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच गुजरातच्या राजकोटमध्ये कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीबाबतही न्यायालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

राजकोटमधील कोविड रुग्णालयात गुरुवारी रात्री आग लागली. या आगीत सहा रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. त्याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. केंद्रीय गृह सचिव देशभरातील सरकारी रुग्णालयातील अग्निसुरक्षेबाबत बैठक घेतील आणि योग्य ते निर्देश देतील, असे केंद्राने स्पष्ट केले आहे.

देशभरात कोरोनाचे संक्रमण वाढत असून जनतेमध्ये याबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. ठिकठिकाणी मोर्चे, मिरवणूका काढण्यात येत आहेत. तर सुमारे 80 टक्के लोकं मास्क वापरत नसल्याचे दिसून येत आहे. जे मास्क वापरतात, ते त्यांच्या गळ्याभोवतीच लपेटलेले असतात. जनतेने योग्य प्रकारे मास्क वापरावेत. तसेच कोरोना रोखण्याबाबत सरकारने आणि आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याची गरज न्यायालयाने व्यक्त केली.

जनतेत कोरोनाबाबत निर्देशांचे पालन करण्याची इच्छाशक्ती नसून अनास्था दिसत आहे. हे चिंताजनक असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक तीव्र असून कोरोनाचे संक्रमण झपाट्याने पसरत असल्याचे केंद्राने न्यायालयात सांगितले.

10 राज्यांमध्ये कोरोना झपाट्याने फैलावत असून 77 टक्के रुग्ण या राज्यातील असल्याचेही केंद्राने सांगितले. त्यावर न्यायालयाने कोरोनाबाबतच्या नियमावलीची कठोरतेने अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली. तसेच कोरोना रोखण्यासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा असे सांगत या संकटाच्या काळात राजकारण करू नये. एकत्र येत या संकटाचा मुकाबला करण्याची गरज न्यायालयाने व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या