बुलंदशहर अॅसिड हल्ला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची युपी आणि केंद्र सरकारला नोटीस

supreme_court

 सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हलाला आणि बहुपत्नीत्वविरोधात याचिका करणार्‍या शबनम या महिलेवर अॅसिड हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला नोटिस पाठवली असून १७ सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. पिडीत महिला शबनम राणीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. शबनम राणीने याचिकेत एम्समध्ये उपचार व्हावे अशी मागणी केली होती. या प्रकरणाची सुनवाई आता सोमवारी होईल.

हलाला आणि बहुपत्नीत्वाला विरोध करणार्‍या महिलेवर अॅसिड हल्ला

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये गुरुवारी शबनम राणीवर दोन बाईक स्वारांनी अॅसिड हल्ला केला. या हल्ल्यानंतर जखमी शबनमला जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे. हा हल्ला तिचा दीर आणि त्याच्या मित्राने केल्याचा आरोप तिने केला आहे. शबनमला मूलतत्ववाद्यांनीही धमकी दिली होती. पोलीस यासंबंधी तपास करत आहेत.

शबनमने तिहेरी तलाक, हलाला आणि बहुपत्नीत्वाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिक दाखल केली होती. आपल्या पतीकडून जीवाला धोका असल्याची तक्रारही तिने पोलिसांत दाखल केली होती. आठ वर्षापूर्वी शबनमचा विवाह मुजम्मिलशी झाला होता. या दाम्पत्याला तीन अपत्य आहेत.

काही महिन्यांपूर्वी मुजम्मिलने शबनमला तिहेरी तलाक दिला होता. आणि आपल्या भावाशी हलाला करण्यासाठी दबाब टाकला होता. शबनमला हा हलाला मान्य नव्हता, म्हणून तिच्या सासरच्यांनी तिच्यावर अत्याचार करण्यास सुरूवात केली. या सर्व प्रकरणाला कंटाळून शबनमने हलाला आणि बहुपत्नीत्वाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.