‘या’ गावात दलितांना चप्पल घालण्यास आहे मनाई, अनिष्ठ रुढीविरोधात आंदोलन

सामना ऑनलाईन । म्हैसूर

कर्नाटकातील एका गावात दलितांना मंदिरात जाणे तर दूर, पण पायात चप्पल घालण्याची देखिल परवानगी नाही आहे. 21 व्या शतकात जगत असताना देखील अनिष्ठ रूढी परंपरांनी समाज अद्यापही ग्रासला असल्याचे दिसत आहे. याचच एक उदाहरण म्हणजे कर्नाटकातील रत्तिहाली या गावात दलितांना मंदिरात प्रवेश करणं तर दूरच राहिल तर पायात चप्पल घालण्यावर देखिल मनाई आहे. अखेरीस या निर्दयी परंपरेला कंटाळून लोकांनी प्रशासनाविरूद्ध आंदोलन पुकारले आहे.

रत्तिहाली येथे झालेल्या एससी-एसटी जागृती समितीच्या बैठकीत उपायुक्त अभिराम शंकर यांनी पहिल्यांदा हा मुद्दा मांडला. समितीतील सदस्यांनी या बैठकीत अनुसूचित जाती आणि आदिवासी लोक यांसोबत भेदभाव केल्याची अनेक प्रकरणे सांगितली. सोबतच दलितांनी अनवाणी राहणे आणि मंदिरात प्रवेश न करणे हा मुद्दादेखिल बैठकीत मांडण्यात आला.

केआर नगर येथिल दिवाकर यांनी सांगितले की, एससी-एसटीसोबत होणाऱ्या छळवणूक प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली जाते. मात्र त्यानंतर पोलिसांकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नाही, किंवा असा पर्याय काढला जातो ज्यामुळे पीडीत व्यक्तीलाच आणखी त्रास सहन करावा लागतो. ‘कर्नाटकातील टिप्पूर गावात दलितांना गावामध्ये केस कापण्यास देखील मनाई आहे’, अशी गंभीर माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.