नांदेड सरकारी धान्य घोटाळा प्रकरणात आरोपींना पोलीस कोठडी

148

सामना प्रतिनिधी, नांदेड

नांदेडमध्ये गाजलेल्या सरकारी धान्य घोटाळा प्रकरणात इंडिया मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीच्या मालकासह त्याचा व्यवस्थापक आणि शासकीय धान्याची वाहतूक करणारे दोन कंत्राटदार यांना नायगावच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी महादेवी राठोडे यांनी तीन दिवस अर्थात 14 मे 2019 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

जुलै 2018मध्ये इंडिया मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनी येथे पोलिसांनी शासकीय धान्याने भरलेले गहू आणि तांदळाचे ट्रक पकडले होते. त्यावेळी प्रथमतः 11 ट्रक चालकांना अटक झाली होती. न्यायालयाने त्यांना नंतर जामीन दिला होता. या प्रकरणात काही दिवसानंतर प्रकरणाचा अमलदार बदलण्यात आला. या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण शाखेकडे देण्यात आला. राज्य गुन्हा अन्वेषण शाखेचे अप्पर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंगल हे आहेत. त्यांच्या नेतृत्वात राज्य गुन्हा अन्वेषण विभागाची टीम या गुन्ह्याचा तपास करीत होती.

या गुन्ह्यात उच्च न्यायालयाने सुद्धा दखल घेतली आणि त्यानंतर अत्यंत थंड बस्त्यात पडलेल्या कामाला जोराची सुरुवात झाली. दिनांक 10 मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक लता फड, पोलीस उपअधीक्षक आय.ए.पठाण, आर.के. गुजर, बी.एल. राठोड, पोलीस निरीक्षक बी.एन.आलेवाड, इंगळे, पोलीस कर्मचारी जमील मिर्झा, आर.आर.सांगळे, आर.एन. स्वामी, एस.व्ही.राचेवार या पथकाने या प्रकरणातील इंडिया मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीचे मालक अजय बाहेती, कंपनीचे व्यवस्थापक जयप्रकाश तापडीया, शासकीय धान्याची वाहतूक करणारे ठेकेदार राजू पारसेवार आणि ललितराज खुराणा या चौघांना अटक केली.

दिनांक 11 मे रोजी सकाळी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने धान्य घोटाळ्यातील या चार आरोपींना नायगावच्या न्यायालयात हजर केले. सरकारी वकील यांनी या प्रकरणात पोलीस कोठडी दिल्याशिवाय या प्रकरणाचा तपास योग्य रितीने असंभव असल्याचा मुद्दा मांडला. याउलट आरोपींच्या वतीने अ‍ॅड.व्ही.एम. देशमुख, अ‍ॅड.अमित डोईफोडे, अ‍ॅड.श्रीकांत नेवरकर आणि इतरांनी हा गुन्हा घडून आठ महिने झाले आहेत, मग या गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत काय प्रगती झाली असा प्रश्न उपस्थित केले. सर्व कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत, आता जप्त करण्यासाठी काही शिल्लक नाही असा मुद्दा मांडला. या प्रसंगी पोलीस अधीक्षक लता फड यांनी प्रकरणातील काही मुद्दे पोलीस कोठडीशिवाय समोर येऊच शकत नाहीत, अशी मांडणी न्यायालयासमक्ष केली. युक्तीवाद ऐकून न्या.महादेवी राठोडे यांनी अजय बाहेती, जयप्रकाश तापडीया, राजू पारसेवार आणि ललितराज खुराणा या चार जणांना 14 मे पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

या प्रकरणातील उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेमध्ये पुढील सुनावणीची तारीख 20 मे अशी आहे. या प्रकरणात नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केलेला अहवाल, कंपनीमध्ये पोलिसांनी जप्त दाखविलेले धान्याचे पोते आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तेथे असलेले पोते यात दिसणारा फरक यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सोबतच एखादा गुन्हा दाखल झाला असताना त्या प्रकरणात जिल्हाधिकारी आपला स्वतंत्र अहवाल तयार करू शकतात काय, याही मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंगल यांनी आपल्या जीवनातील स्वच्छ व पारदर्शक कारकीर्दीप्रमाणे याही प्रकरणात त्वरित कारवाई करुन सत्यच असते हे दाखवून दिले.

आपली प्रतिक्रिया द्या