खेड- बहुउद्देशीय सहकारी पतसंस्थेत 88 लाखांचा गैरव्यवहार, 12 जणांवर गुन्हा दाखल

367

खेड तालुक्यातील बहुउद्धेशीय सहकारी पतसंस्थेत 88 लाखाची अफरातफर झाल्या प्रकरणी तत्कालीन चेअरमन, सचिव आणि संचालक यांच्यासह १२ जणांवर खेड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ही अफरातफर 1 एप्रिल 2005 ते 31 मार्च 2008 या दरम्यान झाली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. चेअरमन, सचिव आणि संचालक यांनी खोटी कर्ज प्रकरण दाखवून पैसे लाटल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तब्बल 11 वर्षांनी या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणात सहभागी असलेल्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. या बाबतची फिर्याद लेखा परीक्षक सुनील सासवडकर (रा. चिपळूण) यांनी केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 1 एप्रिल 2005 ते 31 मार्च 2008 या दरम्यान संस्थेवर संस्था सदस्यांनी निवडून दिलेले चेअरमन, सचिव, सहसचिव व संचालक यांनी एकमेकांच्या संगनमताने खोटी कर्ज प्रकरणे करून बोगस कर्ज वाटप केले. या बोगस कर्जावरील व्याज वसूल करताना तो कमी दराने आकारून कर्ज रक्कम कर्ज खतावणी रजिस्टरला जमा म्हणून नोंद केली. मात्र त्याच्या नोंदी रोजकिर्दीमधे दाखवल्या नाही. या प्रकारे सुमारे ३ वर्षात 88 लाख 32 हजार 555 रुपयांचा अपहार केला. संस्था सदस्यांनी विश्वासाने निवडून दिलेल्या चेअरमन, सचिव, सहसचिव व संचालक यांनी अश्या प्रकारे सदस्यांचा विश्वास घात करून संस्थेचा पैसे लाटणे ही बाब गंभीर असल्याने या प्रकरणी लेखा परीक्षक सुनील सासवडकर यांनी 17 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी खेड पोलिसात फिर्याद दाखल केली.

सुरेश महादेव साळुंखे, (तत्कालीन सचिव) विश्वास बळवंत पाटील (तत्कालीन सचिव, हयात नाही) रमेश सुरेश कवडे (तत्कालीन सहसचिव, हयात नाही) , मनोहर बाळकृष्ण शेलार (तत्कालीन चेअरमन) विलास भिकू गुहागरकर, बाळाराम पांडुरंग शिर्के, प्रशांत नारायण माजलेकर, योगेश सतीश मपारा, सुशांत सतीश कदम, शामल शामराव मोरे, कविता तुकाराम कडू (सर्व तत्कालीन संचालक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी खेड पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या