जलयुक्त घोटाळा; भतानेंचा निलंबन प्रस्ताव सचिवांकडे!

50

सामना प्रतिनिधी । बीड

जिल्ह्यातील परळी तालुक्यात पूर्वी राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानात कोट्यावधी रूपयांचा घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांचा बुधवारी अंबाजोगाई न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला असून कृषी प्रधान सचिव, पुणे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश भताने यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जलयुक्त शिवार सचिव एकनाथ डवले यांच्याकडे बुधवारी पाठविला आहे. भताने यांच्या कार्यकाळात केवळ परळीच नाही तर इतर तालुक्यांमध्ये देखील जलयुक्त शिवार योजनेत अनेक ठिकाणी गोंधळ झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस कमिटीचे वसंत मुंडे यांनी केली आहे.

मागील दोन महिन्यांपासून परळी तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेतील घोटाळा गाजत आहे. कोट्यावधी रूपयांची सिंचनाची कामे केवळ कागदावरच दाखवून निधी लाटला गेला असल्याचे प्रकार चौकशीत समोर आले आहेत. यावरून सामाजिक कार्यकर्ते वसंत मुंडे यांनी हे प्रकरण मंत्रालयापर्यंत लावून धरले होते. यावरून संबंधित घोटाळेबाज अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. बुधवारी त्या अधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अंबाजोगाई न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्यांना जामिन फेटाळला आहे. याशिवाय रमेश भताने यांच्या निलंबनाचा प्रस्ताव देखील कृषी प्रधान सचिव यांनी जलयुक्त सचिव एकनाथ डवले यांच्याकडे पाठविला आहे. या प्रकरणात भताने यांच्यावर काय कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे.

आपली प्रतिक्रिया द्या