जनसेवा पतसंस्थेत करोडोंचा घोटाळा; श्रीवर्धनच्या नगराध्यक्षाला ठेवीदारांनी लाथाबुक्यांनी तुडवला

श्रीवर्धनचे विद्यमान नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे यांना जनसेवा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी बेदम मारहाण करून चोप दिल्याने एकच चर्चा श्रीवर्धनमध्ये रंगली आहे. नरेंद्र भुसाणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष असून जनसेवा पतसंस्थेचे व्यवस्थापक आहेत. जनसेवा पतसंस्थेत भुसाणे यांनी 4 कोटींची अफरातफर केल्याचे बोलले जात आहे. पतसंस्थेत मोठा गैरव्यवहार झाला असून ठेवीदारांचे पैसे मिळण्यात अडचणी येत असल्याने ठेवीदार संतप्त झाले असून त्यांनी आपला राग भुसाणे यांना चोप देऊन काढला. यावेळी पोलिसांनी भुसाणे यांचे संरक्षण करण्याचा असफल प्रयत्न केला. ठेवीदारांचा मार खाल्यानंतर भुसाणे हे गुपचुप निघून गेले. मात्र यानंतर तरी ठेवीदारांचे पैसे मिळतील का, ही शंकाच आहे.

रायगड जिल्ह्यात पेण अर्बन बँक, रोहा अर्बन बँक, गोरेगाव अर्बन बँक तसेच काही पतसंस्था ह्या संचालक मंडळांनी डबघाईत घातल्या आहेत. त्यामुळे हजारो ठेवीदारांचे करोडो रुपये अडकले गेले आहेत. श्रीवर्धन मधील नावारूपाला आलेली जनसेवा नागरी सहकारी पतसंस्थाही अशीच चेअरमन व संचालक, व्यवस्थापक मंडळानी डबघाईत घालवली आहे.

श्रीवर्धन शहरात जनसेवा नागरी सहकारी पतसंस्था 1994 साली स्थापन करण्यात आली होती. या पतसंस्थेच्या थोड्याच दिवसात ग्राहकांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहक पतसंस्थेत ठेवी ठेऊ लागला.

जनसेवा नागरी सहकारी पतसंस्था नावारूपाला आली असता पतसंस्थेचे व्यवस्थाप व नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे यांनी 4 कोटींची अफरातफर केली असल्याचा आरोप होत आहे. त्यातच भुसाणे हे काही दिवस श्रीवर्धन मधून गायब होते.

पतसंस्थेत करोडोचा गैरव्यवहार झाला असून अनेक ग्राहकांची ठेवी पतसंस्थेत अडकली आहे. 19 सप्टेंबर रोजी सर्वांची ठेवी परत मिळतील असे बोलले जात होते. मात्र ठेवीदारांचे पैसे न मिळाल्याने ठेवीदारांनी नरेंद्र भुसाणे याना चपलेने, हाता बुक्याने मारहाण केली. पोलिसांनी भुसाणे यांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर ठेवीदारांनी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती.

श्रीवर्धनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज 19 सप्टेंबर रोजी येणार असल्याने ठेवीदार ही यात्रा रोखणार असल्याचे बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या