नगर महानगरपालिकेचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक योगिराज शशिकांत गाडे यांनी शहरात सुरू असलेल्या सार्वजनिक कामांमध्ये 60 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. गाडे यांनी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांना पत्र लिहून या भ्रष्टाचाराबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गाडे यांनी आपल्या पत्रात असे नमूद केले आहे की, शहरात सध्या ड्रेनेज, काँक्रीट रस्ते, डांबरी रस्ते इत्यादी कामे सुरू आहेत. परंतु, या कामांमध्ये शासकीय योजना व मंजूर अंदाजपत्रकानुसार कामे न होत नसल्याचे दिसून आले आहे. निरीक्षणात खालील त्रुटी आढळल्या आहेत. रस्त्यांची मापे कमी केली जात आहेत. स्टीलच्या जाळ्यांचा वापर केला जात नाही. काँक्रीटच्या रस्त्यांसाठी प्लास्टिक पत्रे वापरले जात नाहीत.
रस्त्यांची पातळी अंदाजपत्रकातील मापदंडानुसार नाही आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात आहे. या सर्व त्रुटींच्या आधारे अंदाजे 60 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा अंदाज गाडे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, करदात्यांच्या पैशांचा हा गैरवापर गंभीर असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
शहरातील नागरिकांचे हित लक्षात घेऊन माजी नगरसेवक योगिराज गाडे यांनी महानगरपालिका प्रशासनाला तातडीने उत्तर देऊन या कामांवर योग्य तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, नगर शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. पण त्याचा दर्जा हा राखला जात नाही असे दिसून येत आहे. त्यातच नगरसेवक गाडे यांनी त्यांच्या प्रभागामध्ये त्यांनी लोकांना जागृत करून कशा पद्धतीने कामांना मंजुरी दिली जाते, कशा पद्धतीने कामे केली जातात, नेमके कामाची निविदा कशाप्रकारे काढली जाते, त्यात काय काय उल्लेख केला जातो याची माहिती त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये सर्वांना दिली आहे. त्यामुळे अनेक बाबी या उजेडात आलेल्या असून नागरिक सुद्धा आता दक्ष होऊ लागलेले आहे.
नगरमध्ये अनेक कामे केली जात असताना त्याची गुणवत्ता राखली जात नाही, असा आरोप केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सुद्धा आता या सर्व बाबींकडे लक्ष द्यावे व जिथे नियमांचे उल्लंघन केले आहे, तिथे कारवाई करावी असे आव्हान सुद्धा केले जात आहे.