उपनगरीय रुग्णालयात कामगार पुरवठय़ाच्या कंत्राटात घोटाळा; निविदा रद्द करण्याची शिवसेनेची मागणी

पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांच्या कामगार पुरवठय़ाच्या कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ठरावीक कंत्राटदाराला हे काम देण्यासाठी हा घोटाळा झाला असून या कामाच्या कार्यादेश तातडीने रद्द करून संबंधित निविदा प्रक्रियाही रद्द करावी अशी मागणीही त्यांनी पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे.

उपनगरीय रुग्णालयात बहुद्देशीय कामगार उपलब्ध करण्यासंदर्भात काढलेल्या ई निविदेस चुकीच्या पद्धतीने कंत्राटदार नियुक्त करण्यात आले आहे. या प्रकरणात मोठय़ा प्रमाणात अनियमितता होऊन घोटाळा झाला असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. सदर निविदेमध्ये एकूण 5 निविदा सादर करणाऱया कंत्राटदारांपैकी 4 कंत्राटदारांनी दर विश्लेषण हे परिशिष्ट ‘ब’ प्रमाणे सादर केलेली आहेत. तर एका कंत्राटदाराने सदर दर विश्लेषण हे निविदा जाहीर करणाऱया विभागाला अपेक्षित असलेल्या परिशिष्टप्रमाणे सादर केलेले आहे. याबाबत फक्त एकाच कंत्राटदाराला हेतुपुरस्सर कळविण्यात आले असल्याची शंका दानवे यांनी व्यक्त केली.

10 कोटींच्या निविदेला एकच प्रतिसाद कसा?
या कामाच्या 10 कोटी रक्कमेच्या निविदा प्रक्रियेत फक्त एकमेव प्रतिसादात्मक निविदा असताना संपूर्ण प्रक्रिया पार पाडल्याचे दिसून आले आहे. एका विशिष्ट कंत्राटदाराच्या फायद्यासाठी या सर्व बाबी केल्याचे दिसून येते. त्यामुळे महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची शंका अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. यात मर्जीतल्या कंत्राटदाराला हेतुपुरस्पर सदर कंत्राट देण्यासाठी निविदा प्रक्रियेत अनियमितता करून सदर कंपनीची निवड करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.