परीक्षा शुल्क अवघे 80 रुपये, तरीही शिष्यवृत्ती परीक्षेकडे विद्यार्थ्यांची पाठ

218

राज्यातील हुशार विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यासाठी शालेय स्तरावर घेण्यात येणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. दरवर्षी या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटत आहे. 16 फेब्रुवारी 2020 मध्ये होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थी नोंदणी लाखोंनी घटली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन नावनोंदणी करण्याची सुरूवात 1 ऑक्टोबरपासून सुरू झाली. 15 नोव्हेंबरपर्यंत ही मुदत आहे मात्र नाव नोंदणीला फारसा प्रतिसाद नाही. आतापर्यंत राज्यभरातून पाचवीच्या परीक्षेसाठी 2 लाख 77 हजार 798 तर आठवीच्या परीक्षेसाठी 1 लाख 87 हजार 311 विद्यार्थ्यांनीच नोंदणी केली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थी नोंदणी वाढावी, यासाठी शाळास्तरावर विशेष सभा घेण्यात येणार आहे. पाचवी आणि आठवीमधील 50 टक्के विद्यार्थी या परीक्षेस बसतील असे उद्दीष्ट आहे.
सामान्य विद्यार्थ्यांसाठी परीक्षाशुल्क 80 रूपये आणि अनुसुचित जाती, जमाती, मागासप्रवर्गासाठी तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 20 रूपये असूनही परीक्षेला आतापर्यंच प्रतिसाद नाही.

पूर्वी इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येत होती. पण 2017 मध्ये पाचवी आणि आठवीसाठी परीक्षा घेण्यात येत आहे. चौथी आणि सातवीचे वर्ग जिल्हा परिषद आणि महापालिकेशी संलग्न असल्याने परीक्षाशुल्क माफ होते. तसेच मुख्याध्यापक 100 टक्के विद्यार्थी परीक्षा देतील याला प्राधान्य द्यायचे- दत्तात्रय जगताप,प्राथमिक शिक्षण संचालक

आपली प्रतिक्रिया द्या