पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत अदिती घवाळी पश्चिम मुंबईतून पहिली

सामना प्रतिनधी । मुंबई

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल बुधवारी जाहीर झाला. पाचवीच्या परीक्षेत श्री माधवराव भागवत शाळेची विद्यार्थिनी अदिती संदीप घवाळीने 93.05 टक्के गुण मिळवत पश्चिम मुंबईतून प्रथम तर राज्यातून 17 वा क्रमांक पटकावला. तर आठवीच्या परीक्षेत ठाणे येथील आईएस चंद्रकांत पाटकर शाळेचा विद्यार्थी श्रेयस दुर्वेने 94.40 टक्के गुण मिळवत राज्यात चौथा येण्याचा मान मिळविला आहे.

राज्यातील एकूण 4 लाख 95 हजार 546 विद्यार्थ्यांनी पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा दिली. यांपैकी 1 लाख 9 हजार 230 विद्यार्थी पात्र ठरले असून 16 हजार 579 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. 17 हजार 217 विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर होते. एकूण निकालाची टक्केवारी 22.04 टक्के आहे. आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या एकूण 3 लाख 41 हजार 991 विद्यार्थ्यांपैकी 63 हजार 236 विद्यार्थी पात्र ठरले असून 14 हजार 815 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. या परीक्षेला 11 हजार 377 विद्यार्थी गैरहजर होते. निकालाची एकूण टक्केवारी 18.49 इतकी आहे. विद्यार्थ्यांना छापील गुणपत्रिका शाळांमार्फत 1 ऑगस्टपर्यंत मिळतील, असे राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी स्पष्ट केले. अदिती ही दैनिक सामनाचे कर्मचारी संदीप घवाळी यांची मुलगी आहे.

मुंबईतून प्रथम आलेले पाचवी, आठवीचे विद्यार्थी

पाचवी

  • पश्चिम मुंबई – अदिती घवाळी, 93.05
  • दक्षिण मुंबई – श्लोक भावे, 88.19
  • उत्तर मुंबई – साची गोगरी, 88.19

आठवी

  • दक्षिण मुंबई – विराज साळुंखे, 93.70
  • उत्तर मुंबई – आर्या भोसले, 90.90
  • पश्चिम मुंबई – सिद्धांत शेणॉय, 89.51