विज्ञानातील विशारदा

दिलीप जोशी

आमच्या ताईला एकच मुलगी आहे, पण हुशार आहे. पहिला नंबर कधी सोडलेला नाही. कोणा एका मावशीने केलेलं कौतुक ऐकून ती मुलगी खूश होण्याऐवजी खट्टू झाली आणि म्हणाली, ‘पण हुशार आहे म्हणजे काय गं मावशी? मुली काय हुशार नसतात? तूसुद्धा एक मुलगीच होतीस ना? आणि आपण अनवधानाने चुकीचं बोलून गेल्याचं मावशीने मान्य केलं. कोणत्याही क्षेत्रातील प्रावीण्य ही स्त्री किंवा पुरुष यापैकी कोणा एकाची मक्तेदारी नसते हे मानवी इतिहासाने अनेकदा सिद्ध केलंय. तरीसुद्धा पुरुषप्रधान संस्कृती मनात रुजलेल्यांकडून नकळत अशी चुकीची तुलना होत असते.

केवळ ‘चूल आणि मूल’ हेच बाईचं क्षेत्र ही कल्पना तर आपल्याकडेच नव्हे तर जगात जवळपास सर्वत्रच अठरा-एकोणिसाव्या शतकापर्यंत रूढ होती. परंतु या शतकांच्या कितीतरी आधीच्या काळात शेकडो स्त्रीयांनी जीवनाच्या विविध क्षेत्रात, अगदी रणांगणावरसुद्धा आपलं कर्तृत्व सिद्ध केलं होतं. उत्तम राज्य कारभार केला होता, मात्र याला अपवाद समजून स्त्री ‘अबला’ मानण्याचं काम अनेक संस्कृतींनी केलं. आता त्यात फरक पडतो आहे. ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ असं वाहनावरही नोंदलेलं दिसतं. समाजाच्या सर्व थरांतील हुशार, प्रज्ञावंत महिला मनात आणलं तर मुक्तपणे स्वतःची प्रगती करून घेऊ शकतात. अर्थात काही ठिकाणी अजूनही त्यांच्यापुढची आव्हानं मोठी आहेत हे खरं पण काळ बदलतो आहे.

आपल्याकडे प्राचीन काळातील गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा अशा अनेक विदुषींचा उल्लेख केला जातो. महाराष्ट्रातील संतांच्या मांदियाळीतही सोयराबाई, गोणाई, बहिणाबाई, मुक्ताबाई, जनाबाई, मीराबाई अशी कितीतरी अधिकारी नावं आढळतील.

अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात विचारवंत म्हणून प्रसिद्ध असलेल्या कित्येक महिलांची यादी देता येईल. आता तर कल्पना चावला किंवा सुनीता विल्यम्ससारख्या धडाडीच्या महिलांनी अंतराळही जिंकलं आहे. शिक्षणावाचून मुलींना वंचित ठेवण्याचा काळ मागे पडला असला तरी अनेक महिलांनी अत्यंत कष्टाने आणि लढा देऊन तो अधिकार प्राप्त केला आहे. महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले किंवा इंग्लंडमधील रामालीन लॅन्कहर्स्ट यांच्यासारख्या महिलांनी स्त्र्ााr शिक्षणासाठी आपल्या हक्कासाठी जे लढे दिले त्यामुळे पुढच्या पिढय़ांचा मार्ग सोपा झाला.

विज्ञानाच्या क्षेत्रात महिलांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचं स्मरण करण्यासाठी ११ फेब्रुवारी हा दिवस जगातील वैज्ञानिक विशारदांच्या कर्तृत्वाची जाणीव करून देतो. प्राचीन काळात ‘आजीबाईचा बटवा’ जी औषधं सांभाळून ठेवत होता. त्यामध्ये आजीबाईंना कोणत्या रोगावर कोणतं आयुर्वेदिय औषध द्यावं हे ठाऊक असल्याची गोष्ट नकळतच मान्य करण्यात आली होती. पूर्वीच्या काळी अडलेल्या बाईची सोडवणूक करणाऱ्या कुशल सुईणींना ते विज्ञान परंपरेने ठाऊकच होतं.

कालांतराने अनेक गोष्टींचे अभ्यासक्रम सुरू झाले आणि बराच काळ मुलींना या एज्युकेशनपासून वंचित ठेवण्यात आलं. ‘बुकं शिकून काय करायचंय?’ अशी भूमिका तथाकथित बुद्धिमंतांनीही एकेकाळी मुलींच्या बाबतीत घेतलेली आढळते.

गणित, विज्ञान यामध्ये गती असलेल्या मुलींची संख्या पूर्वापार खूपच होती. १४व्या शतकातील भूमिती शिकवणाऱ्या शिक्षिकेचं चित्र प्रसिद्ध आहे. हिल्डगार्ड बिनजेन या जर्मन महिला वैज्ञानिकेचं अनेक विषयांत प्रावीण्य होतं. तत्त्वज्ञानापासून जीवशास्स्त्रापर्यंत कित्येक गोष्टींतील तिचा अभ्यास चकित करणारा होता. अशा विज्ञानवंत महिलांची शेकडो वर्षांतील कर्तृत्वाची यादी खूप मोठी आहे.

२०व्या शतकाच्या आरंभी विज्ञानाचं नोबेल पारितोषिक सुरू झालं आणि रेडियमचा शोध लावणाऱया मादाम क्युरी यांना भौतिक शास्त्रातलं नोबेल १९०३ मध्ये मिळालं. एवढंच नव्हे तर १९११ मध्ये त्या पुन्हा रसायनशास्त्रातील नोबेलच्या मानकरी ठरल्या. तोपर्यंत कुणाही पुरुषाला दोन वेळा नोबेल मिळालं नव्हतं हे विशेष.

आपल्याकडे कमल सोवनी यांना विज्ञान क्षेत्रात अभ्यास करण्यासाठी थेट सी. व्ही. रामन यांच्यासारख्यांशी वाद घालावा लागला. पदार्थातील प्रथिनांवर मूलभूत संशोधन करणाऱया कमलाताईंना त्यांच्या मोठय़ा भगिनी दुर्गा भागवत यांनी विज्ञान विशारदा म्हटलं. वसुमती धुरू यांचं हे पुस्तक जरूर वाचा. म्हणजे विज्ञान क्षेत्रात काम करण्याचा ध्यास घेतलेल्या महिलांना एकेकाळी किती अडथळय़ांची शर्यत पार करावी लागत होती ते लक्षात येईल. जाती, धर्म, लिंग किंवा अन्य कोणतीही आडकाठी वैज्ञानिक अभ्यासात येता कामा नये. ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात मुक्तपणा हीच गोष्ट महत्त्वाची जगभरच्या विज्ञानातील अनेक विशारदांनी ती केव्हाच सिद्ध केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या