पंचायत समितीच्या आवारात भरली शाळा

16

सामना ऑनलाईन। इगतपुरी

दोन दिवसांपूर्वी मिळकत कर थकवल्याने नगरपरिषदेने शहरातील जिल्हा परिषदेच्या तीन शाळांना सील ठोकले होते.या प्रकाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी श्रमजीवी संघटनेने आज पंचायत समितीच्मया आवारातच शाळा भरवली. यावेळी शाळेला लावलेले सील काढून टाकण्यासह संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, मुख्याधिकाऱयांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी अशी मागणी करत  विद्यार्थ्यांसह कार्यकर्त्यांनी पंचायत समितीमध्ये जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान याच शाळांतील  शिक्षकसुद्धा पालकांशी नेहमी अरेरावी करत असल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. नगरपरिषदेने शनिवारी तिन्ही शाळांना मिळकत कर न भरल्याच्या कारणावरून सील केले होते.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे म्हणून श्रमजीवी संघटनेने गटविकास अधिकारी किरण जाधव, गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले होते. त्यानुसार आज सर्व विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते आदींनी पंचायत समितीत धडक मारली. यावेळी गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी आंदोलनकर्त्यांना समजावून सांगून शाळांचे सील काढले असल्याचे सांगितले. यावेळी आंदोलनकर्ते आणि गटविकास अधिकाऱयांत  चर्चा झाली. गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी मुख्याधिकाऱयांना परिस्थितीची कल्पना देत माफी मागायला सांगितली. भविष्यात कोणत्याही शाळांना यापुढे सील लावण्यापूर्वी पंचायत समितीला विश्वासात घेऊ असेही त्यांनी सांगितले. सील लावणाऱया संबंधितांवर आठवडाभरात गुन्हे दाखल करण्यासह तक्रारी असलेल्या शिक्षकांवर कठोर कारवाई करू असे लेखी आश्वासन पंचायत समितीने श्रमजीवी संघटनेला दिले.

 

आपली प्रतिक्रिया द्या