बिनभिंतीची शाळा!

515

>>ज्योत्स्ना गाडगीळ

आपल्या पाल्याने जगाच्या स्पर्धेत मागे राहू नये म्हणून सुट्टीच्या दिवसातही पालक आपल्या पाल्यांना अनेक प्रकारच्या शिबिरात घालतात. त्यासाठी वाट्टेल तेवढे शुल्क भरतात. म्हणूनच आज गल्लीबोळातून `समर कॅम्प’चे पेव फुटले आहेत. असे उपक्रम वाईट नसतात, पण अल्पावधीचे असतात. त्यामुळे मुलांच्या बाबतीत `पुढे पाठ मागे सपाट’ अशी गत होते. तसे होऊ नये, म्हणून मुलांच्या वरचेवर संपर्कात राहून संस्काराचे बीज त्यांच्या मनात कायमस्वरूपी रुजवण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक व कथाकथनकार प्रकाशभाई मोहाडीकर यांनी `साने गुरुजी कथामाला’ या संस्थेची सुरुवात केली. आज महाराष्ट्रात या उपक्रमाच्या एकूण ६०० शाखा आहेत. पैकी वरळीच्या कोळीवाड्यातील शाखेने या उपक्रमातील सातत्य अबाधित ठेवले आहे. त्यांना ‘अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला’तर्फे `सर्वोत्कृष्ट शाखा’ म्हणून पुरस्कारही मिळाला आहे. कोळीवाड्याच्या शाखेत गरीब व सर्वसामान्य परिस्थितीतील १५०-२०० विद्यार्थी दर रविवारी निःशुल्क कथामालेचा आस्वाद घेतात. त्यांच्या कथामालेत काय काय घडते, याबद्दल सांगत आहेत वरळी शाखेचे प्रमुख देवकीनंदन मुकादम.

`दर रविवारी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत वरळी कोळीवाड्यातील हनुमान मंदिरात कथामालेचे वर्ग भरतात. २०० विद्यार्थी आणि १५-२० स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने तेथील हनुमान मंदिरात गोळा होतात. शिस्तबद्धपणे रांगेत बसतात, `खरा तो एकचि धर्म’ आणि `देह मंदिर चित्त मंदिर’ या प्रार्थना एकमुखाने म्हणतात, स्वयंसेवकांनी वाचलेल्या विविध कथा, त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थी शांततापूर्वक ऐकतात, स्वतः ऐकलेल्या, वाचलेल्या कथा, कविता सर्वांसमोर मांडतात आणि पाहता पाहता मंदिराचे ज्ञानमंदिर बनवतात. मुलांच्या प्रतिसादामुळे आणि कार्यकत्र्यांच्या सक्रिय सहभागामुळे आमची ही ‘बिनाभिंतीची शाळा’सातत्याने सुरू आहे. समाजाच्या तळागाळातील पिढी सुसंस्कृत बनावी हा या कथामालेचा मुख्य उद्देश आहे. आणि तो उद्देश पूर्णपणे सफल होत आहे’, असे मुकादम सांगतात.

devkinandan-mukadam

कथामालेचा उगम झाला, तो साने गुरुजींच्या विचारांतून. साने गुरुजी मुलांना गोष्टी सांगत. कथेच्या माध्यमातून मुलांच्या चारित्र्याची घडण व्हावी म्हणून संस्कारदायी कथा सांगत. नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी मुले त्यांच्याभोवती गोळा होत असत आणि गोष्ट ऐकण्यात रमून जात असत. गुरुजींनी आपल्या कथाकथनातून आणि बालसाहित्य निर्मितीतून पुढच्या पिढीच्या मनात आपल्या देशाबद्दल, संस्कृतीबद्दल, मानवता धर्माबद्दल स्वाभिमान जागृत केला. ११ जून १९५० रोजी साने गुरुजींची प्राणज्योत मालवली. गुरुजींनी हाती घेतलेले काम अविरतपणे सुरू राहावे म्हणून त्यांचे अनुयायी प्रकाशभाई यांनी २४ डिसेम्बर १९५१ मध्ये गुरुजींच्या जयंतीच्या दिवशी दादर येथे `साने गुरुजी कथामाला’ संस्थेची स्थापना केली. त्या दिवशी प्राचार्य भागवत यांनी महाभारतातील गोष्ट सांगून या उपक्रमाची सुरुवात केली. सर्व वृत्तपत्रातून कथामालेचे कौतुक झाले. हा उपक्रम शाळा-शाळांत, गावागावांत पोहोचवण्याचे प्रकाशभाईंनी ध्येय ठरवले. हळूहळू या उपक्रमाचे लोण महाराष्ट्रभर पसरले. १९५७ पासून सर्व शाखांचे संघटन करणारे अधिवेशन ठाणे जिल्ह्यात सुरू झाले. त्यालाही आता ५० वर्षे पूर्ण झाली. नुकतेच गोव्यातील फोंडा येथे `अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे’ सुवर्णमहोत्सवी अधिवेशन पार पडले.

बाबा आमटे, भाऊसाहेब रानडे, ग. प. प्रधान, वा. ना. दांडेकर, माधव गडकरी, प्रभाकर भुसारी, नारायण आठवले इ. अनेक मान्यवर मंडळी या उपक्रमास जोडली गेली. तरीदेखील या उपक्रमाचा कुठेही बोभाटा न करता आजवर हे काम अखंडितपणे सुरू आहे, तेही कार्यकर्त्यांच्या खिशातून! काही ठिकाणी कथामाला सुरू झाल्या, परंतु त्या पाक्षिक, मासिक किंवा उत्सवापुरत्या मर्यादित राहिल्या, तर काही शाखा मुकादम यांच्यासारख्या उत्साही कार्यकत्र्यांमुळे सातत्याने टिकून राहिल्या. महाराष्ट्र शासनाने `शाळा तिथे कथामाला’ हा उपक्रम सुरू केला होता, परंतु कालौघात तो `मूल्य शिक्षणाच्या’ तासिकेबरोबरच कालबाह्य झाला.

कथाकथन या विषयात प्रकाशभाईंचा हातखंडा होता. `एक होती चिऊ आणि एक होता काऊ’ ही बालपणापासून ऐकत आलेली गोष्ट प्रकाशभाईंच्या तोंडून ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध होत असत. त्यांची कथाकथन शैली एवढी सुंदर होती, की गोष्ट ऐकणारा श्रोता अंतर्मुख होऊन त्यावर विचार करत असे. हेच कथाकथानाचे बलस्थान आहे. गोष्टीतून हृद्यसंवाद साधता येतो. त्यातूनच जवळीक निर्माण होते, जिव्हाळा निर्माण होतो. विद्वत्तापूर्ण भाषणाने जे साधता येत नाही, ते गोष्टीतून साधणे सहज शक्य असते. छ. शिवाजी महाराज, महात्मा गांधी, संत विनोबा भावे यांसारख्या थोर विभूतींची जडणघडण गोष्टींतूनच झाली आहे. देव, धर्म, देश, माणुसकी यांची व्यापक दृष्टी व साहिष्णुवृत्ती तसेच शौर्य, साहस, प्रेम, करुणा, चातुर्य, उद्योग आदी सद्गुणांची पेरणी बालमनात गोष्टीतूनच होऊ शकेल. गोष्टीच्या आधाराने नाट्या, नृत्य, चित्र, संगीत इ. बालविकासाची अनेक अंगे फुलवता येतील. मुलांच्या ठायी भावसाक्षरता, सुजाण नागरिकत्व आणि उच्च अभिरुची निर्माण केल्यानेच त्यांचे व्यक्तिमत्व सुसंस्कारी व संपन्न होणार आहे. लहान मुले गोष्टी ऐकण्यासाठी आसुसलेली असतात. पूर्वी आजी-आजोबा, मावशी, आत्या, काका, काकू अशी अनेक मंडळी त्यांना गोष्टी सांगून त्यांचे बालविश्व समृद्ध करत असत. मात्र, आता ही सगळी नाती परस्परांपासून मनाने, विचाराने, घराने दुरावली आहेत. आई-वडील नोकरी- व्यवसायात व्यस्त असल्याने मुलांची बौद्धिक भूक भागत नाही. मग मोबाईल गेम खेळण्यापलीकडे त्यांच्याकडे मनोरंजनाचे साधन उरत नाही. अशा पार्श्वभूमीवर साने गुरुजी कथामालाच हवी.

कोळीवाड्यातील कथामालेतर्फे वर्षभरात मुख्य चार उपक्रम राबवले जातात. बाल आनंदोत्सव- ज्यात कथामालेच्या सर्व विद्याथ्र्याचा सामुदायिक वाढदिवस साजरा केला जातो. कारण, अनेक मुलांची वाढदिवस साजरा करण्याइतकी आर्थिक परिस्थिती नसते. अशी मुले सामूहिक वाढदिवस सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतात. त्यानिमित्त विविध मनोरंजात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. खाऊ वाटला जातो, भेटवस्तू, खेळणी दिली जातात. या सोहळ्यासाठी जवळपास हजार मुले उपस्थित असतात. दुसरा उपक्रम विद्यार्थी गुणगौरव सोहळा, ज्यात दहावी-बारावी तसेच गत वर्षातील उत्तीर्ण विद्याथ्र्यांचा गुणगौरव केला जातो. साने गुरुजी जयंती व पुण्यतिथीला अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तर वर्धापन दिनाला समाजातील सन्माननीय ज्येष्ठ मंडळींचा गौरव केला जातो. शिवाय दिवाळीच्या सुट्टीत हस्ताक्षर, निबंध, प्रश्नमंजुषा, कथाकथन, गाणी, स्वयंरचित कविता इ. स्पर्धा घेतल्या जातात. `दिवाळी संध्या’ हा बालगीतांवर आधारित सांगीतिक कार्यक्रम केला जातो. याशिवाय संस्थेचे अन्यही उपक्रम सुरू असतात. जसे की, `साने गुरुजी कथामाला प्रकाशन’ यातर्फे लेखक, कवी यांना प्रकाशक म्हणून संस्थेचे नाव दिले जाते, ज्याचा त्यांच्या पुस्तकाला खूप फायदा होतो. तसेच `वरळी प्रबोधन कट्टा’ ज्यात समाजातील गरीब, मध्यमवर्गीय, तळागाळातील नागरिकांचे वैचारिक प्रबोधन व्हावे म्हणून नामवंत व्याख्यात्यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले जाते. पैशांअभावी या उपक्रमास तूर्तास स्थगिती द्यावी लागत असल्याची खंत मुकादम व्यक्त करतात. परंतु अन्य उपक्रम राबवण्यासाठी कार्यकर्ते पुढाकार घेत असल्याचे ते आवर्जून नमूद करतात. रमेश वरळीकर, रमेश तांबे, मनोज राणे, देवराम माळी, नारायण आगळेकर आणि अन्य सदस्य मंडळी तसेच डॉ. श्रीकांत भाये, डॉ. शैलजा वरळीकर, केसरीनाथ पाटील, धर्मराज रणदिवे ह्या सर्वांची तन-मन-धनाने साथ लाभते.

आज असंख्य मंडळी या कथामालेशी जोडलेली आहेत. अनेक विद्यार्र्थी यातून घडले आहेत, उच्च पदावर पोहोचले आहेत, तरीदेखील त्यांनी संस्थेशी आपले ऋणानुबंध जोडून ठेवले आहेत. रेखा रमेश ठाकूर या नवोदित लेखिका आपल्या उन्नतीचे श्रेय कथामालेला देतात. बालपणी यातून आपल्यावर संस्कार झाले, लेखिका झाल्यावर प्रकाशक म्हणून ह्या संस्थेचे नाव मिळाले आणि आता तिथे श्रमदानातून आनंद मिळत असल्याचे त्या सांगतात. आपण घेतलेल्या योगविद्येचा मुलांकडून सराव करून घेतात. आपणही उत्स्फूर्तपणे ह्या उपक्रमाशी जोडून घ्यावे आणि आपल्या परिसरात कथामालेची सुरुवात करावी असे त्या आवाहन करतात.

समाजात असे अनेक हात सत्कार्यासाठी झटत आहेत, आपणही त्याचा एक भाग होऊया.

याबाबत साने गुरुजींनीही मंत्र दिला आहे-

करील मनोरंजन जो मुलांचे,

जडेल नाते प्रभुशी तयाचे!

आपली प्रतिक्रिया द्या