साय-फाय – द कोकेन शार्क

>> प्रसाद ताम्हनकर

स्वतःच्या सुखासाठी, आनंदासाठी आणि मुख्य म्हणजे मौजमजेसाठी कोणतेही व्यसन करणारे लोक हे समाजासाठी कायम एक धोका असतात. त्यांच्या व्यसनामुळे घरासोबत समाजाचेदेखील प्रचंड नुकसान होत असते. हे नुकसान आता मनुष्यप्राण्याच्या जोडीने इतर प्राणिमात्रांनादेखील धोका निर्माण करायला लागले आहे. ब्राझीलमध्ये संशोधकांच्या एका गटाने तिथल्या समुद्राच्या रिओ-डी-जनेरियोच्या किनारपट्टीवर शार्पनोज शार्क या माशांवर संशोधन सुरू केले आहे. या संशोधनामध्ये या माशांच्या यकृत आणि स्नायूंमध्ये चक्क कोकेन आढळून आले आहे. अशा प्रकारचा हा पहिला अभ्यास आहे.

संशोधनात समोर आलेल्या निष्कर्षांमुळे संशोधकदेखील चक्रावून गेले आहेत. या संशोधनाने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सध्या माशांच्या एकाच प्रजातीचा अभ्यास केला जात असला तरी माशांच्या इतर प्रजाती तसेच इतर समुद्री जिवांमध्येदेखील या कोकेनचा शिरकाव झाला आहे का? माशांच्या शरीरात हे कोकेन कोणत्या मार्गाने पोहोचले? या कोकेनमुळे माशांच्या वर्तणुकीत काही बदल झाले आहेत का? सर्वात मुख्य प्रश्न म्हणजे, अशा माशांचे सेवन करणाऱया लोकांच्या शरीरातदेखील या माशांच्या माध्यमातून हे कोकेन पोहोचले आहे का?… आणि पोहोचले असेल तर त्याचे मानवी शरीरावर काही दुष्परिणाम होऊ लागले आहेत का? कोकेन अथवा इतर कोणत्याही अमली पदार्थाचा मानव आणि इतर प्राण्यांच्या शरीरावरदेखील दुष्परिणाम होत असतो हे मागील काही संशोधनांतून पुढे आले आहे.

सध्या माशांपर्यंत जे कोकेन पोहोचले आहे ते कोणत्या मार्गाने पोहोचले असावे याबद्दल संशोधकांची वेगवेगळी मते आहेत. समुद्रमार्गे केली जाणारी तस्करी हे सर्वात मोठे कारण असू शकते असे काही संशोधकांना वाटते. जहाज पलटल्याने समुद्रात बुडालेले कोकेन, सुरक्षा यंत्रणांच्या भीतीने समुद्रात फेकलेले कोकेन, अनधिकृतपणे समुद्राच्या पाण्याजवळ चालवल्या जाणाऱ्या कोकेन बनवण्याच्या प्रयोगशाळा अशी विविध कारणे यामागे असल्याचे त्यांचे मत आहे. ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणावर स्कुबा डायव्हर्सच्या (गोताखोर) माध्यमातून समुद्रातील जहाजापर्यंत कोकेन पोहोचवले जाते. या प्रवासादरम्यान अनेकदा कोकेन समुद्रात पडते. काही संशोधकांच्या मते कोकेनचे व्यसन करणाऱया लोकांच्या मलमूत्राच्या माध्यमातूनदेखील हे कोकेन माशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

सध्या शार्कच्या एकाच प्रजातीचा अभ्यास चालू असल्याने इतर प्रजातींचा अभ्यास जसा वाढत जाईल तशी अनेक नवी तथ्ये समोर येत जातील यावर संशोधक ठाम आहेत. शार्क हे मांसाहारी असल्याने इतर माशांची शिकार करून पोट भरतात. छोटे मासे जर कोकेनमुळे दूषित असतील तर त्यांच्या सेवनाने हे कोकेन शार्कच्या पोटात जात आहे का हे तपासण्यासाठीदेखील विशेष अभ्यास केला जात आहे. यापूर्वी यासंदर्भात काही समुद्री जिवांचा अभ्यास करण्यात आला होता. मात्र सध्या सुरू असलेल्या शार्कच्या संशोधनात पूर्वीच्या समुद्री जिवांच्या तुलनेत सध्याच्या शार्कच्या शरीरात शंभरपट जास्त कोकेन आढळून आले आहे.

ब्राझीलसोबत अमेरिका, ब्रिटन आणि इतर अनेक मोठय़ा देशांमध्ये नियमितपणे शार्कचे मांस खाल्ले जाते. त्यामुळे अशा शार्कच्या माध्यमातून कोकेनने अन्न साखळीत प्रवेश मिळवलेला आहे असा काही संशोधकांचा ठाम विश्वास आहे. इथे वेगवेगळ्या नावाने मासे विकले जातात आणि शार्क फिन सूपसारखा पदार्थ तर प्रचंड लोकप्रिय आहे. शार्क आणि इतर मासे पोहताना आपल्या कल्ले आणि त्वचेद्वारे पाणी शोषत असतात. त्यामुळे अशा पाण्यात मिसळलेले कोकेन त्यांच्या शरीरात प्रवेश करत असते. अशा पाण्यात मनुष्य पोहायला उतरला तर त्याच्या शरीराला मात्र अशा पाण्याचा धोका नाही, असे संशोधक सांगतात.

अन्न साखळीच्या माध्यमातून जे कोकेन मानवी शरीरात प्रवेश करते आहे, त्याच्या दुष्परिणामांचा एक वेगळा अभ्यास करण्याची गरज सर्वांनी बोलून दाखवली आहे. प्लॅस्टिकसारखे घातक पदार्थ जनावरांच्या पोटात जात असल्याच्या समस्येशी लढा चालू असताना आता हा एक नवा धोका जगासमोर आला आहे. संशोधक, सागरतज्ञ आणि प्राणिप्रेमी याविरुद्ध कोणता लढा उभारतात आणि या लढय़ात आपण काय मदत करू शकतो हे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

[email protected]