
>>प्रसाद ताम्हनकर
टेस्ला कंपनीचा संस्थापक आणि स्टारलिंक या उपग्रहावर आधारित असलेल्या इंटरनेट सेवेचा कर्ता करविता असलेला एलोन मस्क हा सध्या सतत कोणत्या ना कोणत्या वादाचा केंद्रबिंदू बनताना दिसत आहे. आधी ट्विटर खरेदी करण्याच्या मुद्दय़ावर वादात सापडलेला एलोन मस्क सध्या युव्रेनच्या युद्धावर केलेल्या टिपण्यांमुळे आणि युव्रेनमधील स्टारलिंकचे फंडिंग मागे घेण्याच्या धमकीमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. अर्थात, काही दिवसांपूर्वी दिलेली ही धमकी आपण खरी करणार नसून; युव्रेनवासी स्टारलिंकची सेवा नेहमीप्रमाणे वापरू शकतील, असे त्याने नुकतेच नमूद केले आहे.
रशिया आणि युव्रेन युद्धाच्या अत्यंत गंभीर प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर एलोन मस्क वादात का सापडला आणि त्याच्या स्टारलिंक इंटरनेट सेवेची युद्धग्रस्त युव्रेनला इतकी गरज का आहे, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. या वादाची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा युव्रेन रशिया युद्धाबद्दल एलोन मस्कने काही वादग्रस्त ट्विट केले. जगभरातील तरुणाईच्या गळ्यातला ताईत असलेली ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेव्हा काही टिपणी करते तेव्हा ती जगभरात प्रचंड चर्चेत येते हे उघड आहे. त्यातच एलोन मस्कने ट्विटर पोलद्वारे त्याच्या फॉलोअर्सना विचारले की, ‘डोनबास’ आणि ‘क्रिमिया’मधील रहिवाशांना ठरवू दे की, त्यांना रशियाबरोबर राहायचे आहे की युव्रेनमध्ये. तुमचे मत काय आहे?’
एलोनच्या या ट्विटवर प्रचंड गदारोळ माजला. युव्रेनच्या जर्मनीतील राजदूतांबरोबरच, युव्रेनच्या अध्यक्षांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. त्यांच्यामध्ये ट्विटरवर चांगलेच शाब्दिक युद्धदेखील रंगले. याचेच रूपांतर पुढे एलोनच्या नाराजीत आणि स्टारलिंकच्या सेवेबद्दलच्या विधानात झाले. सध्या युद्धाचे भीषण परिणाम भोगत असलेल्या युव्रेनसाठी आणि त्याच्या सैन्यासाठी स्टारलिंकची इंटरनेट सेवा अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची आहे. एलोनच्या या निर्णयामुळे त्याच्या विधानाचे पडसाद जगभरात उमटू लागले.
स्टारलिंक ही इंटरनेट सेवा प्रामुख्याने जगभरातील दुर्गम भागात राहणाऱया लोकांना विना अडथळा, जलद इंटरनेट सेवा मिळावी यासाठी सुरू करण्यात आली आहे. मस्कच्या पंपनी तर्फे त्यासाठी 2018 पासून 3000 पेक्षा जास्त उपग्रह अवकाशात सोडण्यात आल्याचे सांगितले जाते. यासाठी उपग्रहाचा वापर करण्यात येत असल्याने त्यासाठी मास्ट, वायरींचे जाळे अशा मोठय़ा स्तरावरील पायाभूत सुविधांची आवश्यकता भासत नाही. उपग्रहाच्या मदतीने मिळणारी ही सेवा त्यामुळेच युव्रेनसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
रशियाने युव्रेनवर हल्ल्या चढवल्यानंतर काही दिवसांतच एलोन मस्कने युव्रेनमध्ये स्टारलिंकची इंटरनेट सेवा सुरू केली. जेव्हा रशियाच्या हल्ल्याने युव्रेनमधील मोबाइल आणि इंटरनेट सेवा बंद पडली, नेमके त्याच वेळी स्टारलिंक मदतीला धावली. एलोन मस्कच्या सांगण्यानुसार, आजवर 20,000 डिश रिसीव्हर आणि राऊटर युव्रेनला पाठवण्यात आले आहेत. स्टारलिंकने अनेक महत्त्वाच्या सेवा सुरू करण्यासाठी खूप मदत केल्याचे युव्रेनचे उपपंतप्रधानदेखील मान्य करतात. 100 पेक्षा जास्त क्रूझ क्षेपणास्त्रच्या हल्ल्यामुळे दळणवळण आणि ऊर्जेच्या पायाभूत सुविधा नष्ट झाल्या होत्या; पण स्टारलिंकने पुन्हा सर्व सुविधा परत मिळवण्यासाठी मोलाची मदत केली.’ असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
इतर सिग्नलप्रमाणे या सेवेचे सिग्नल ब्लॉक करता येत नसल्याने युव्रेन युद्धभूमीवर देखील या सेवेचा मोठय़ा प्रमाणावर वापर करत आहे. युव्रेन सैन्याचे मुख्यालय आणि लढणारे सैनिक यांच्यात संदेशाची देवाण-घेवाण होण्यासाठी या सेवेचा प्रामुख्याने वापर होतो आहे, असे युद्धतज्ञ सांगतात. अशा आवश्यक सेवेत खंड पडल्यास त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात हे आता लक्षात आले असेलच. त्यामुळे या सेवेसंदर्भात एलोन मस्कच्या विधानानंतर चर्चेला उधाण येणे स्वाभाविक आहे. मात्र आता एलोन मस्कने स्वतः पुढाकार घेऊन या सेवेबद्दल आश्वस्त केल्याने गैरसमजाने आणि संकटाचे ढग दूर होण्यास मदत होणार आहे. मात्र त्याच वेळी आपण तंत्रज्ञानावर किती अवलंबून आहोत आणि त्याचे परिणाम भविष्यात काय होऊ शकतात याची झलक म्हणूनदेखील या सगळ्या वादाकडे पाहण्याची गरज आहे हे नक्की!