‘अनंत’ विज्ञान प्रसार

>> प्रदीप म्हात्रे

मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अ. पां. देशपांडे यांना विज्ञान प्रसारकार्यात भरीव योगदानाबद्दल 2020 सालचा ‘इंदिरा गांधी पुरस्कार’ जाहीर झाला. मराठी विज्ञान परिषदेच्या सर्वांगीण कार्यात तर त्यांचे मोठे योगदान आहेच, पण विज्ञानाच्या प्रसाराचे ‘शिवधनुष्य’ही त्यांनी यशस्वीपणे पेलले आहे.

पेशाने इंजिनीयर असलेल्या अ. पां. ऊर्फ अनंत पांडुरंग देशपांडे यांनी चौफेर ओळख झाली ती त्यांनी केलेल्या विज्ञान प्रसाराच्या महत्त्वपूर्ण कार्यामुळे. ‘मराठी विज्ञान परिषदे’च्या माध्यमातून त्यांचे हे काम काही दशकांपासून अव्याहतपणे सुरू आहे. अ. पां. यांनी शिक्षण घेतले ते इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनीयरिंगचे. 30-35 वर्षे वेगवेगळय़ा कंपन्यांमध्ये नोकरीदेखील केली. मात्र ती करीत असताना 1970च्या सुमारास त्यांचा मराठी विज्ञान परिषदेशी संबंध आला आणि 1974 पासून ते परिषदेचे कार्यवाह पद सांभाळत आहेत. नोसिलमध्ये काम करताना परिषदेच्या कामाचा उरक चालू होता. कंपनीत सर्वसामान्य कामगारांशी सलोख्याचे संबंध ठेवत त्यांच्याकडून काम करवून घेण्याची हातोटी प्राप्त केली. याचा उपयोग परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून काम करवून घेताना त्यांना उपयोगी आला. 1997 साली स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतरही त्यांचे विज्ञान प्रसाराचे कार्य विविध माध्यमांतून आजतागायत सुरू आहे.

1970 च्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने परिषदेच्या संपर्कात आलेले देशपांडे मविप मध्यवर्तीच्या कार्यक्रमात सक्रिय झाले. 1973 साली मविप-ईशान्य मुंबई विभाग स्थापन तर केलाच, त्याशिवाय 18 वर्षे त्या विभागाचे कार्यवाहपद भूषविले. 1975 पासून आजतागायत ‘मराठी विज्ञान परिषद मध्यवर्ती’च्या कार्यवाहपदी आहेत. तेव्हापासून परिषदेच्या वार्षिक संमेलनाच्या (आताचे अधिवेशन) आयोजनात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्याविषयीचे एक बोलकं उदाहरण म्हणजे 1976 साली मुंबईत झालेले मविपचे अकरावे अधिवेशन. उत्कृष्टपणे आयोजिलेल्या या संमेलनाला ‘अ(से) करावे संमेलन’ अशी दाद मिळाली. गेली 45 वर्षे सातत्याने परिषदेचे कार्यवाहपद सांभाळताना दरम्यानच्या प्रवासात त्यांना शरद नाईक आणि डॉ. चिं. मो. पंडित या दोन मित्रांची कार्यवाह म्हणून उत्तम साथ मिळाली याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. विज्ञान प्रसाराच्या उद्देशाने वर्तमानपत्रे व मासिकांतील 1200 लेख, 265 जाहीर भाषणे, आकाशवाणी व दूरदर्शनवरील जवळपास 65 कार्यक्रम ‘अ. पां.’ यांच्या खात्यावर असून त्यांनी लिहिलेली आणि संपादित केलेल्या पुस्तकांची संख्या 75च्या घरात आहे. व्यक्तिचरित्र लिहिण्यातही देशपांडेंचा हातखंडा असून त्यांचे ‘विद्वज्जन’ पुस्तक वाचण्यासारखे आहे. अ.पां.नी मराठी विज्ञान अधिवेशनाच्या पहिल्या 38 अध्यक्षीय भाषणांच्या ‘विज्ञान आणि वैज्ञानिक’ या खंडाचे संपादन केल्यामुळे एक चांगला दस्तऐवज तयार झाला. बाळ फोंडके यांच्यासह विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि ‘शिल्पकार चरित्र’ या कोशांचे सहसंपादन केले. डॉ. विवेक पाटकर यांच्यासोबत मराठीतील प्राचीन विज्ञान लेखन खंडाचे संपादन केले. वर्तमानपत्रांसाठी विज्ञानविषयक सदरांचे संयोजन त्यांनी अनेक वर्षे केले आहे. मराठी विज्ञान परिषदेच्या कार्याचा इतिहास त्यांनी ‘मराठी विज्ञान परिषद-नाबाद 51’ या नावाने रचला. गेली पाच वर्षे विज्ञान आणि गणित शिक्षकांसाठी राज्यस्तरीय परिषदेचे संयोजन करीत असून त्यामध्ये एका राष्ट्रीय शिक्षक परिषदेचा अंतर्भाव असून नजीकच्या काळात पुन्हा राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे संयोजन मराठी विज्ञान परिषदेकडे येण्याची शक्यता आहे. त्याचे एकमेव कारण देशपांडे यांचे उत्तम नियोजन. 1997 साली नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्स या संस्थेची स्थापना केली आणि त्याद्वारे विविध भाषांतील विज्ञान प्रसारक आणि संस्थांच्या सूचीचे प्रकाशन त्यांनी केले.

विज्ञान प्रसाराचे काम करत असताना स्वतःच्या प्रकृतीची उत्तम काळजी घेत अनेक छंद जोपासले. विज्ञान प्रसाराच्या कामाकरिता देशपांडे यांना मिळालेल्या पुरस्कारांमध्ये फाय फाऊंडेशन पुरस्कार (1995), महाराष्ट्र साहित्य परिषद-विज्ञान ग्रंथकार पुरस्कार (2006), केंद्र सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान खात्याचा राष्ट्रीय पुरस्कार (1999) इत्यादींचा समावेश असून महाराष्ट्र विज्ञान अकादमीचे ते सन्मान्य सदस्य आहेत. 42 व्या महानगरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले असून गेल्या वर्षी अमेरिकेतील डल्लास येथे झालेल्या बृहन्महाराष्ट्र अधिवेशनात मराठी विज्ञान परिषदेच्या कार्याविषयी सादरीकरण करून अमेरिकेत विज्ञान पताका फडकविण्याचे काम केले. ‘भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी-इन्सा’च्या इंदिरा गांधी पुरस्काराच्या निमित्ताने अ. पां. देशपांडे यांनी प्रा. यश पाल, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. बाळ फोंडके, वेंकटवर्धन या दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या