विज्ञान प्रदर्शनातील दिव्यांग कुबडी ठरली लक्षवेधी!

343

सामना प्रतिनिधी । देवरुख

अपंग व्यक्तींसाठी नियमित कुबड्या बाजारात मिळत असतात. मात्र त्याच्या उंचीमुळे त्या सर्व अपंगांना उपयोगी पडतातच असे नाही. याचाच अभ्यास करुन संगमेश्वर तालुक्यातील हरपुडे शाळा क्रं . ०१ मधील शिक्षक सुनील करंबेळे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी ‘ दिव्यांग कुबडी ‘ तयार केली असून गर्दीच्या ठिकाणी आणि रात्रीच्या वेळी देखील ही नवी कुबडी अपंगांना अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या कुबडीने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.

समाजात सूक्ष्म निरीक्षण करुन सुनील करंबेळे हे प्राथमिक शिक्षक समाज हिताचे विविध उपक्रम राबवित असतात. यापूर्वी त्यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेले हिरकाढणी यंत्र आणि कुंभाराचे चाक हे प्रकल्प देखील उपयुक्त ठरले आहेत. या प्रकल्पांनी तर जिल्हा आणि राज्य विज्ञान प्रदर्शनापर्यंत बाजी मारली होती. यावर्षी करंबेळे यांनी दिव्यांग व्यक्तींची गरज ओळखून त्यांच्यासाठी एक उपयुक्त कुबडी तयार करण्याची संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडली. विद्यार्थ्यांची आणि करंबेळे यांची संकल्पना एकत्र आल्यानंतर त्यातून अत्यंत सोप्या पध्दतीची दिव्यांग कुबडी साकार झाली .

kubdi-2

पायाने दिव्यांग अथवा अपघातग्रस्तांसाठी ही कुबडी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या कुबडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही कुबडी रात्रीच्यावेळी प्रकाश देण्याचे कामही करते. तसेच कोणत्याही उंचीच्या अपंग व्यक्तीला ही कुबडी आपल्या गरजेनुसार उंचीने कमीजास्त करता येणार आहे. कमीतकमी खर्च, टीकावू आणि टाकाऊ वस्तूंपासून ही कुबडी तयार करण्यात आलेली आहे. या कुबडीचा वापर करत असतांना दिव्यांग व्यक्तींना मोबाईल देखील वापरणे सोयीचे होणार आहे. केवळ सहाशे पन्नास रुपये एवढ्या कमी खर्चात ही कुबडी तयार करण्यात आली आहे .

संगमेश्वर तालुक्याच्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ही उपयुक्त कुबडी ठेवण्यात आली होती. या कुबडीने विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून या प्रकल्पाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. ही दिव्यांग कुबडी हरपुडे शाळा क्रं ०१ चे प्राथमिक शिक्षक सुनील करंबेळे यांच्या संकल्पनेतून पायल गुरव, आचल देवळे या विद्यार्थ्यांनी तयार केली.

आपली प्रतिक्रिया द्या