व्रतस्थ वैज्ञानिक

>> प्रदीप म्हात्रे

रसायन तंत्रज्ञान संस्था (आयसीटी) ही देशातील एक अग्रमानांकित संस्था. रसायन तंत्रज्ञानाचा गौरवशाली वारसा लाभलेल्या या संस्थेच्या कुलगुरूपदी डॉ. अनिरुद्ध पंडित यांची नेमणूक झाली आहे. प्रसिद्धीपासून अलिप्त असलेले डॉ. पंडित यांची या क्षेत्रात व्रतस्थ वैज्ञानिक अशी ओळख आहे.

रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या (इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी-आय.सी.टी.) कुलगुरूपदी प्रा. अनिरुद्ध भालचंद्र पंडित यांची नियुक्ती अलीकडेच जाहीर झाली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि आयसीटीचे कुलपती डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी ही नियुक्ती जाहीर केली. प्रा. जी. डी. यादव यांच्याकडून कुलगुरू पदाची सूत्रे प्रा. पंडित लवकरच स्वीकारतील. तत्पूर्वी ऑगस्ट 2019 मध्ये या पदासाठी रीतसर अर्ज मागवण्यात आले होते. त्या काळी ‘युडीसीटी’ या नावाने ओळखली जाणारी आजची रसायन तंत्रज्ञान संस्था, शिक्षण-संशोधन क्षेत्रात आज देशातील नामांकित संस्था म्हणून गणली जात असून अभिमत विद्यापीठाचा दर्जा संस्थेतला प्राप्त झाला आहे.

7 डिसेंबर 1957 रोजी जन्मलेल्या प्रा. पंडित यांनी रसायनशास्त्रातील बी.टेक. पदवी बनारस हिंदू विद्यापीठातून 1980 साली प्राप्त केली तर 1984 साली पीएच.डी. (टेक) ही पदवी प्रा. जे. बी. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आय.सी.टी.’तून मिळवली. त्या वेळी संस्थेचे भूतपूर्व संचालक प्रा. मनमोहन शर्मा यांचेही मार्गदर्शन प्रा. पंडित यांना लाभले. दरम्यान जे. बी. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्याच संस्थेत पीएच.डी. विद्यार्थ्यांकरिता सह-व्याख्याता म्हणून काम केले. 1984 ते 1990 या कालावधीत केम्ब्रिज विद्यापीठाच्या रसायन अभियांत्रिकी विभागात प्रा. जे. एफ. डेव्हिडसन (प्रा. मनमोहन शर्मा यांचे पीएच.डी.चे मार्गदर्शक) यांच्या अंतर्गत आधी रिसर्च असिस्टंट आणि नंतर रिसर्च असोसिएट म्हणून मल्टिफेज रिऍक्टर्ससंबंधी काम केले. त्यानंतर प्रा. शर्मा यांचा सल्ला शिरोधार्य मानत हिंदुस्थानात परतून ‘आय.सी.टी.’त युजीसी प्राध्यापक म्हणून काम करणे पसंत केले. वास्तविकपणे त्यांना परदेशी स्थायिक होऊन काम करता आले असते.

‘आय.सी.टी.’त खास करून त्यांनी ‘हायड्रोडायनॅमिक कॅव्हिटेशन’ संकल्पनेचा वापर अनेक भौतिकी आणि रासायनिक प्रक्रियांसाठी केला. प्रा. पंडित यांनी राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेसह सागरी पाण्यावर प्रक्रिया करण्याचे तंत्रज्ञान हिंदुस्थानातील एकमेव असून त्याची दखल इंडियन मेरिटाईम ऑर्गनायझेशन (आयएमओ) यांनी घेतली आहे. पाणी हापसण्याच्या पंपाद्वारे त्यांनी सध्या विकसित केलेली पद्धत ग्रामीण-आदिवासी भागासाठी उपयुक्त असून विकसनशील राष्ट्रांसाठीही मार्गदर्शक अशीच आहे. त्यावर त्यांनी स्वतंत्र पुस्तकही लिहिले आहे.

‘आय.सी.टी.’त कार्यरत असणाऱया ऊर्जा विभागात प्रा. पंडित यांचे योगदान मोलाचे असेच म्हणावे लागेल. प्रा. जे. बी. जोशी, डॉ. गो. के. भिडे, प्रा. सुधीर पानसे इत्यादी मातब्बर व्यक्तींचा समावेश असलेल्या या विभागाने पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांच्या सहाय्याने इको कुकर, धूरमुक्त चुलींची निर्मिती केली आहे. त्याप्रमाणे सौरऊर्जेतील उष्णता (प्रोसेस हीट) वापरून सतत चालणारा कुकर बनविला असून त्यामुळे दर तासाला 750 किलो जेवण बनविता येते. अशा पद्धतीचा एक कुकर हेमलकसा येथील डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पात बसविला असून त्याची उपयुक्तता तेथे सिद्ध झाली आहे.
प्रा. पंडित यांनी पीएच.डी.साठी मार्गदर्शन केलेले 46 विद्यार्थी आज विविध नामांकित संस्थांमध्ये अध्यापन करीत असून उर्वरित 22 विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पूर्ण करीत आहेत. त्यांचे पावणेचारशे शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले असून 45 भाषणे त्यांनी दिली आहेत. वीसएक कंपन्याना ते सल्ला देत असून सुमारे 30 प्रायोजित प्रकल्पांवर त्यांनी कामे केली आहेत, ज्यांची रक्कम काही कोटींमध्ये आहे.
प्रा. पंडित यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांमध्ये इंडियन सोसायटी ऑफ टेक्निकल एज्युकेशन राष्ट्रीय पारितोषिक (1992), वास्विक ऍवॉर्ड (1996), प्रा. आर. ए. राजाध्यक्ष उत्तम शिक्षक पुरस्कार, आयआयसीएचई हॅड्रेलिया ऍवॉर्ड (2002), डिस्टिंगवीश ऍल्मनी ऍवॉर्ड यू.आय.सी.टी. (2008), इन्साचे विश्वकर्मा मेडल यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

प्रा. जे. बी. जोशी यांच्या पावलावर पाऊल टाकत प्रसिद्धीपासून काहीसे अलिप्त राहणाऱया प्रा. पंडित यांनी आय.सी.टी.तून शिक्षण घेत, अध्यापन करत थेट कुलगुरूपदी झेप घेतली आहे. त्यामुळे त्यांचा कारकिर्दीत आय.सी.टी. नवी क्षितिजे पादाक्रांत करील, ही आशा बाळगायला निश्चितच वाव आहे.
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या