‘इस्रो’च्या शास्त्रज्ञावर झाले होते हेरगिरीचे आरोप; निर्दोष सिद्ध झाल्यावर मिळाली 1.3 कोटींची नुकसानभरपाई

889

केरळ सरकराने मंगळवारी भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे ‘इस्रो’चे माजी शास्त्रज्ञ एस. नंबी नारायणन यांना अडीच दशकापूर्वीच्या हेरगिरी प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी1 कोटी 30 लाखांची अतिरिक्त नुकसान भरपाई दिली आहे. राज्य पोलिसांनी त्यांना हेरगरीच्या प्रकरणात गुंतवल्याचे उघड झाल्याने नारायणन निर्दोष सिद्ध झाले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात केरळच्या मंत्रिमंडळाने त्यांना 1 कोटी 30 लाखांची नुकसानभरपाई देण्यासाठी मंजुरी दिली होती. सरकारने ही रक्कम नंबी यांच्या खात्यावर जमा केल्याचे वृत्त ‘द हिंदू’ने दिले आहे. तिरुवनंतपुरममधील न्यायालयामध्ये सरकारविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेचा निपटारा करण्यासाठी नारायणन यांना ही भरपाई देण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये दिलेल्या आदेशानंतर 79 वर्षीय नारायणन यांनी तिरुवनंतपुरमच्या न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. नारायणन यांना विनाकारण अटक करण्यात आली होती. तसेच त्यांना या प्रकरणात गुतंवण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. तसेच नारायणन यांना 50 लाख रुपये देण्याचे आदेश दिले होते. नारायणन यांना यापेक्षा जास्त नुकसानभरपाई मिळण्याची गरज आहे. योग्य नुकसानभरपाई मिळण्यासाठी नारायणन उच्च न्यायालयात दाद मागू शकतात, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. तसेच या प्रकरणामध्ये नारायणन यांना 10 लाखांची नुकसानभरपाई देण्याची शिफारस मानवी हक्क आयोगाने केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केरळ सरकराने माजी मुख्य सचिव के. जयकुमार यांनी नारायणन यांना देण्यासाठी नुकसानभरपाईची योग्य रक्कम निश्चित करून प्रकरणाचा निपटारा करण्याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यांच्या अहवालानंतर ही अतिरिक्त भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला. केरळ सरकारने दिलेल्या या भरपाईमुळे समाधानी असल्याचे नारायणन यांनी सांगितले. तसेच आपली लढाई भरपाईसाठी नसून अन्यायाविरोधात होती, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

इस्रोच्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांमध्ये नारायणन यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. मात्र, दोन शास्त्रज्ञ आणि दोन मालदिवच्या महिलांसह चारजणांच्या मदतीने क्रायोजेनिक इंजिनांचे तंत्रज्ञान आणि इतर गोपनीय माहिती देशाबाहेर पाठवून हेरगिरी केल्याचा आरोप नारायणन यांच्यावर ठेवण्यात आला होता. तसेच मालदीवच्या दोन महिला गुप्चर अधिकाऱ्यांना संरक्षण विभागाशी संबंधित गोपनीय माहिती लिक केल्याबाबत नारायणन यांना 1994 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. मात्र सीबीआयच्या तपासात नारायणन निर्दोष असल्याचे सिद्ध झाले. तसेच त्यांना आता 1 कोटी 30 लाखांची भरपाईदेखील मिळाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या