म्हातारपणाचे कारण समजले; संशोधकांना मिळणार चिरतरुण राहण्याचा उपाय!

1519

बालपण, तारुण्य आणि म्हातारपण हे आयुष्याचे तीन टप्पे आहेत. यातील बालपण आणि तारुण्य प्रत्येकालाच हवेहवेसे वाटते. मात्र, म्हातारपण नकोसे होते. त्यामुळे म्हातारपण टाळण्यासाठी आणि कायम चिरतरुण राहण्यासाठी संशोधकांचे संशोधन सुरू आहे. यात म्हातारपणाचे नेमके कारण काय, कशामुळे म्हातारपण येते, हे संशोधकांना समजले आहे. त्यामुळे या संशोधनामुळे चिरतरुण राहण्याचा उपाय शोधणे सोपे होणार आहे. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात याबाबतचे संशोधन करण्यात आले.

म्हातारपण येण्याचे खरे कारण शरीरातील हाडांमध्येच असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे म्हातारपण दूर ठेवत चिरतरुण राहण्याचे रहस्य आपल्या हाडांमध्येच असल्याचे संशोधकांनी सांगितले. कोलंबिया विद्यापीठातील जेनेटिक्स विभागाचे प्रमुख प्रोफेसर गेरार्ड कारसेंटी गेल्या 30 वर्षांपासून याबाबत संशोधन करत आहेत. या संशोधनातून म्हातारपणाचे कारण त्यांनी शोधून काढले आहे. हाडांमध्ये असलेले ‘ऑस्टियोकेल्सिन’ हे हार्मोन शरीरातील जुन्या पेशींना हटवून नवीन पेशींची निर्मिती करतात. या प्रक्रियेमुळे शरीराची वाढ होते. शरीराचे वजनही याच प्रक्रियेमुळे वाढते. हाडांमधील हार्मोनही शरीरावर मोठा परिणाम घडवत असल्याचे कारसेंटी यांनी सांगितले. शरीराला उभे राहण्यासाठी मदत करणे आणि हालचालींसाठी हाडांचा उपयोग असतो, असा समज होता. मात्र, हाडांमधील हार्मोनही शरीरावर परिणाम घडवत असून म्हातारपणाला तेच कारणभूत असल्याचे कारसेंटी यांनी सांगितले.

हाडांमधील पेशी शरीरातील इतर पेशी वाढवण्यास मदत करतात. हाडे स्वतःच हार्मोन तयार करतात आणि ते शरीरातील इतर अवयवांकडे पाठवतात. तसेच या हार्मोनद्वारे इतर अवयवांना संकेत पोहचवले जातात. त्यामुळे शरीराला सहजतेने लयबद्ध हालचाल करणे शक्य होते. त्यामुळे म्हातारपण रोखण्यासाठी ‘ऑस्टियोकेल्सिन’ हार्मोन महत्त्वाची भूमिका बजावू शकते. या हार्मोनचे प्रमाण वाढवून चिरतरुण राहणे शक्य होणार आहे. तसेच या हार्मोनमुळे स्मरणशक्ती वाढवण्यासही मदत होणार आहे. या हार्मोनचे प्रमाण वाढवण्याबाबत संशोधन सुरू आहे. मात्र, व्यायाम, योगा, चालणे, सायकलिंग आणि गिर्यारोहण केल्यानेही हे हार्मोन वाढत असल्याचे कारसेंटी यांनी सांगितले. त्यामुळे नियमित व्यायाम करून म्हातारपण लांबवता येते, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या