
नाकात बोट घालून मेकुड काढायची सवय आपल्यापैकी अनेकांना असते. पण, काही जण ते मेकुड (नाकातला सुकलेला शेंबुड) खाऊन टाकतात. ही अतिशय किळसवाणी कृती माणूस का करतो, या प्रश्नाचं उत्तर शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आहे. गंमत म्हणजे फक्त माणूसच नाही तर अन्य अनेक जनावरांमध्ये देखील नाक साफ करण्याची सवय असते, असंही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
नाकात बोटे घालण्याच्या कृतीवर याआधी देखील संशोधन झालं आहे. पण, त्यात मतमतांतरं आहेत. काहींच्या म्हणण्यानुसार स्टेफायलोकोकस नावाचे विषाणू नाकात बोट घालण्याने फैलावतात. तर काहींच्या म्हणण्यानुसार जे लोक मेकुड खातात त्यांना दात किडण्याची समस्या खूपच कमी असते. लेमूर सारख्या प्राण्यांमध्ये तर नाक साफ करण्यासाठी एक वेगळं बोटही विकसित आहे.
शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधाच्या अहवालानुसार, माणूस हा उत्क्रांत होत गेला असला तरी जगभरातील अन्य प्राण्यांच्या प्रजातीनुसार तोही कधी कधी त्याच्या नकळत वेगळं वर्तन करतो. नाकात बोट घालून मेकुड काढणे आणि ते खाऊन टाकणे ही कृती नाकाप्रमाणेच बोट साफ करण्यासाठी घडते, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
ही कृती अत्यंत किळसवाणी असल्याने अनेक लहान मुलांना त्यांचे पालक यासाठी ओरडतात. बऱ्याचदा मोठी माणसंही अशाच प्रकारे नाक साफ करतात. पण, शास्त्रज्ञांनी नाकात बोटं घालण्याची सवय ही न्यूमोनियाला आमंत्रण देणारी ठरू शकते, असं शोधून काढलं आहे. कारण, नाकातले विषाणू बोटांवाटे सर्वत्र पसरू शकतात. तेव्हा किळस वाटण्यापेक्षा देखील स्वच्छतेच्या दृष्टीने ही सवय योग्य नाही, असं अनेक शास्त्रज्ञांचं मत आहे.