वेब न्यूज – अंटार्क्टिकामधील वैज्ञानिक प्रयोग कोरोना विषाणूमुळे थांबले

492

दक्षिण ध्रुवावरील ब्रिटिश अंटार्क्टिक सर्व्हेने कोरोना विषाणूमुळे संशोधन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे फक्त अतिशय महत्त्वाच्या टीम राहतील. तेथील दुर्गम भागातील सर्व संशोधन कामे एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहेत. यात वेगाने वितळणाऱ्य़ा थ्वाइट्स हिमनदीवरील संशोधन कार्याचा समावेश आहे. अमेरिकन संशोधकांसह हे एक महत्त्वाचे संयुक्त संशोधन कार्य होते. ब्रिटिश अंटार्क्टिक सर्व्हेचे असे मत आहे की, जर संशोधन कार्यात सहभागी असणारे लोक आजारी पडले तर त्यांच्यावर उपचार करण्याची क्षमता आणि सुविधा सध्या तरी उपलब्ध नाही.

गेल्या आठवडय़ात इतर आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या समूहाशी सल्लामसलत केल्यानंतर अंटार्क्टिकाला विषाणूच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या काळात अंटार्क्टिकाला जाणारे बरेच लोक दक्षिण आफ्रिका ओलांडून दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि चिली या मुख्य मार्गांद्वारे कनेक्टिंग फ्लाइट किंवा जहाज घेतात, परंतु सध्या सर्व हवाई मार्गांवरील वाहतुकीवर कोरोनामुळे वाईट परिणाम झालेले असल्याने हे मार्ग अद्यापही बंद आहेत. महत्त्वाचे मदतीचे स्रोत मर्यादित असल्याने ब्रिटिश अंटार्क्टिक सर्व्हेला त्यांचे काही महत्त्वाचे प्रकल्प थांबविण्याशिवाय पर्याय नाही. असे असूनही अंटार्क्टिकावरील रोडेरा आणि हेली या मुख्य स्थानकांवर हवामानाशी संबंधित महत्त्वाच्या कामांवर लक्ष ठेवले जाईल यासाठी पूर्ण प्रयत्न केले जाणार आहेत.

अलीकडच्या वर्षांत हेली स्टेशन थंडीच्या दिवसांत बंद होते आणि सर्व वैज्ञानिक उपकरणे स्वयंचलितपणे चालत असतात. सद्य परिस्थितीत हेली स्टेशन उन्हाळ्यामध्येही बंद राहील, परंतु 2021 किंवा 2022 च्या उन्हाळ्यापर्यंत सर्व स्वयंचलित उपकरणे चालू राहतील याची काळजी घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी लागणाऱ्य़ा ऊर्जेची पुरेशी व्यवस्था पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हेली स्टेशनवर इतके इंधन आहे की, ते पुढच्या हिवाळ्यापर्यंत चालेल, परंतु अडचण अशी आहे की, हे इंधन स्वयंचलित यंत्रणेच्या टाकीमध्ये नाही. हे इंधन स्टेशनवरच्या एका मोठ्या टँकमध्ये आहे. ते तिथून काढून यंत्रणेच्या टाकीमध्ये हलवावे लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या