पाकच्या दहशतवादाची चीनसमोर खरडपट्टी

सामना ऑनलाईन, बिश्केक

पाकिस्तानने आधी दहशतवाद पोसणे सोडावे, नंतरच आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, अशी रोखठोक भूमिका मांडत हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासमोर पाकिस्तानची खरडपट्टी काढली. मोदी यांनी या वेळी जिनपिंग यांना हिंदुस्थानमध्ये येण्याचे निमंत्रणही दिले.

शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन समिटदरम्यान मोदी यांनी जिनपिंग यांची भेट घेतली. पाकिस्तानने दहशतवादाची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत, मात्र तसा प्रयत्न केला जात नाही असे नमूद करत मोदी यांनी पाकिस्तानच्या भूमिकेवर आसुड ओढला. मोदी-जिनपिंग भेटीची माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली. दोन्ही नेत्यांनी हिंदुस्थान व चीनमधील मैत्री वाढवण्यावर भर दिला. तसेच वुहान समिट यशस्वी करण्याबाबतही एकमत दर्शवले. बँक ऑफ चायनाची हिंदुस्थानमध्ये शाखा उघडणे आणि मसूद अझहरचा जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश होणे हे चीन व हिंदुस्थानमधील संबंध अधिक दृढ होण्याचेच फलित आहे, असे मोदी म्हणाले.

यंदा हिंदुस्थान आणि चीनमधील मैत्रीच्या संबंधाला 70 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने दोन्ही देशांत 70 कार्यक्रम करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले.