टीम इंडियाने डावललेल्या सूर्यकुमारला ‘या’ देशाची ऑफर, ‘आमच्याकडून खेळणार का?’

देशांतर्गत क्रिकेट आणि आता यूएईमध्ये सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा खेळाडू सूर्यकुमार यादव सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. मात्र तरीही आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची वर्णी लागली नाही.

त्यानंतर सोशल मीडियावर चाहते आणि क्रीडा प्रेमी बीसीसीआय आणि निवड समितीला फैलावर घेत आहेत. त्यानंतर आता न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू स्कॉट स्टायरिसने चक्क सुर्यकुमारला न्यूझीलंडसाठी खेळण्याचा प्रस्ताव दिला आहे.

स्कॉट स्टायरिसचे ट्विट

स्कॉटने याबाबत ट्विट केले आहे. ‘मला वाटतं जर सुर्यकुमार यादव इंटरनॅशन क्रिकेट खेळू इच्छितो तर त्याने परदेशी संघांकडे आपला मोर्चा वळवावा. कदाचित तो न्यूझीलंडकडूनही खेळू शकतो’, असे ट्विट स्कॉट स्टायरिसने केले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सचा खेळाडू कायरन पोलार्ड याने देखील सुर्याचे कौतुक केले होते. त्यानंतर त्याने हिंदुस्थानी संघात निवड न झाल्याने सूर्या नाराज झाल्याचे देखील सांगितलेले.

के. श्रीकांत व विरेंद्र सेहवाग यांनीही केलेली पाठराखण

चाहत्यांसह टीम इंडियाचे माजी खेळाडूही सूर्यकुमारची पाठराखण करत आहे. के. श्रीकांत यांनी निवड समितीवर निशाला साधला असून त्याला टीम इंडियाच्या जर्सीसाठी आणखी काय करावं लागेल? असा संतप्त सवालही विचारला आहे. तसेच टीम इंडियाचा माजी विस्फोटक खेळाडू वीरेंद्र सेहवाग यानेही ‘बंदे मे दम है’ म्हणत त्याला पाठिंबा दिला आहे.

दमदार प्रदर्शन

बुधवारी सूर्यकुमार यादव याने बंगळुरू विरुद्ध मॅच विनिंग खेळी करत आपला ‘गेम’ विराट आणि निवड समितीला दाखवून दिला होता. सूर्यकुमारने 43 चेंडूत नाबाद 79 धावा फटकावत मुंबईला विजय आणि प्ले ऑफचे तिकीट मिळवून दिले. या खेळीनंतर माजी खेळाडू के. श्रीकांत यांनी ट्विट करून निवड समितीला सवाल केला.

आपली प्रतिक्रिया द्या