जुनी कार स्क्रॅप करा, नव्या कारवर सवलत मिळवा

नवीन कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना स्क्रॅपिंग प्रमाणपत्राच्या बदल्यात सवलत देण्याचा निर्णय केंद्र सरकार आणि वाहन उद्योगाने घेतला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी याविषयी सविस्तर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

सणासुदीच्या हंगामापूर्वी कार बनवणाऱ्या कंपन्यांपासून ते लक्झरी वाहन निर्मात्यांपर्यंत वाहन कंपन्यांनी करार केला आहे. त्यानुसार जुने वाहन स्क्रॅप करून नवीन वाहन खरेदी करत असाल तर 1.5 ते 3.5 टक्क्यांपर्यंतची सूट मिळणार आहे. जुनी आणि प्रदूषित वाहने टप्प्याटप्प्याने काढून टाकण्याची योजना आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील जुनी वाहने स्क्रॅप केल्यानंतर खरेदी केलेल्या नवीन वाहनांवर सूट मिळेल. प्रत्येक शहराच्या केंद्रापासून 150 किलोमीटरच्या आत ऑटोमोबाईल स्क्रॅपिंग सुविधा विकसित करण्याची योजना असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.