जागतिक विक्रमासाठी मालवणातील स्कूबा डायवर सज्ज

62

सामना ऑनलाईन,मालवण

राज्यातील पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मालवणातील स्कूबा डायव्हींग व्यावसायिकांनी एकत्र येत जागतिक विक्रम करण्याची तयारी सुरु केली आहे.किल्ले सिंधुदुर्गचा ३५० वा वर्धापन दिन (एप्रिल २०१७) साजरा होत असताना १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज्याच्या जयंतीचे औचित्य साधून जागतिक विक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मालवणातील मच्छिमार, स्कूबा डायवर व व्यावसायिक असे ३५० जण समुद्रात किल्ले सिंधुदुर्गच्या भोवती स्कूबा डायव्हिंगच्या माध्यमातून पाण्याखाली मानवी साखळी तयार करणार असून, शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना देत जागतिक विक्रमाला गवसणी घालणार आहेत.

सागरी तज्ञ डॉ.सारंग कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून व स्कूबा डायव्हिंग सेंटर आणि एमटीडीसी यांच्या सहकार्यातून मालवणातील स्कूबा डायवर व व्यावासिक एकत्र येत ही संकल्पना सत्त्यात उतरवण्यासाठी कंबर कसली आहे.  तर ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’च्या अधिकारी यांच्याशीही पत्रव्यवहार सुरु असुन त्यांच्या अधिकृत परवानगीचे पत्र येत्या चार दिवसात प्राप्त होईल अशी माहिती स्कूबा डायव्हिंग व्यावसाईक अन्वय प्रभू यांनी दिली आहे.

एका महिन्यापूर्वीच २७ डिसेंबर २०१६ रोजी पाण्याखालील आजपर्यंतची सर्वात लांब मानवी साखळी तयार करून पुणे शहरातील ‘क्रिसलीस एंत्राप्रेन्युअर फोरम’ या व्यावसायिकांची संघटना असलेल्या संस्थेच्या १८२ जणांनी थायलंडच्या ‘कोहताव’ या स्कूबा डायव्हिंगसाठी स्वर्ग समजल्या बेटावर विश्वविक्रम केला होता. यापूर्वी हा विक्रम इटलीच्या नावावर होता. २०१६ मध्येच इटलीतील १७३ नागरिकांनी एकत्र येत हा विक्रम केला होता. तीच प्रेरणा घेत भारतातच विश्वविक्रम करण्यासाठी मालवणातील ३५० जणांची टीम सज्ज झाली आहे.

पुणे येथील विक्रमवीरांच्या मते त्यांना स्कूबा डायव्हिंगचा विक्रम भारतातच करायचा होता. परंतु एका वेळेस इतक्या मोठ्या लोकांच्या सहाय्याने स्कूबा डायव्हिंगद्वारे मानवी साखळी करण्यासाठी लागणारी पायाभूत सुविधा भारतात उपलब्ध नाही. त्यामुळे हा विक्रम थायलंड येथे करण्यात आला होता. मात्र सद्य स्थितीत मालवण चिवला बिच, तारकर्ली, वायरी व देवबाग ही किनारपट्टी स्कूबा डायव्हिंग साठी नंदनवन समजली जाते. स्कूबा डायव्हिंगची साधन सामुग्री ही येथील स्थानिक यांच्याकडे आहे. त्यामुळे छत्रपतीना अनोखी मानवंदना देण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे मालवणातील स्कूबा व्यावसाईक यांनी सांगितले

 

आपली प्रतिक्रिया द्या