शिल्पवैभवाच्या मुद्रा

165

<< पाऊलखुणा >> डॉ. मंजिरी भालेराव

महाराष्ट्राच्या मंदिर स्थापत्यशैलीत काळानुरूप बदल होत गेला. संस्कृती वैभवाच्या मुद्रा उमटवणारी ही मंदिरं प्रामुख्याने त्यांचं शिल्पवैभव अधोरेखीत करतात. अशा काही मंदिरांचा घेतलेला वेध.

दगडांचा देश अशी महाराष्ट्राची ओळख ही मुख्यतः सह्याद्रीमुळे आहे. लाखो वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीय उद्रेकाच्या या अवशेषातून महाराष्ट्रात गेली अनेक शतके कलाकारांनी एका वेगळ्याच सृष्टीची निर्मिती केली आहे. महाराष्ट्रातील लेणी आणि मंदिरे पाहताना त्या सगळ्या प्रक्रियेचा विसर पडून आपण फक्त त्या कारागिरीची कमाल पाहत राहतो आणि थक्क होतो. हिंदुस्थानात मुळातच मूर्तिपूजा आणि मंदिर स्थापत्य या गोष्टी वैदिक संस्कृतीत नव्हत्या. तेव्हा यज्ञातील अग्नी हा देवांना आपली आहुती पोहोचवतो ही संकल्पना असल्यामुळे यज्ञ करणे हाच एक पूजेचा प्रकार अस्तित्वात होता. त्यामुळे मूर्ती करणे आणि त्यासाठी मंदिर बांधणे ही संकल्पनाच वैदिक काळात नव्हती. साधारणपणे इ.स.पूर्व तीन या शतकातील यक्षमूर्तींचे काही अवशेष मिळाले आहेत. तसेच त्या काळातील संस्कृत साहित्यातही देवांच्या मूर्तींचे उल्लेख सापडतात. त्यामुळे या काळाच्या थोडे आधी मूर्तिपूजा हिंदुस्थानात रूढ व्हायला सुरुवात झाली होती असे मानले जाते.

इ.स. पहिल्या शतकात हिंदू, बौद्ध आणि जैन या सर्व धर्मीयांनी दगडातील मूर्तींची पूजा करायला सुरुवात केली होती. काळाच्या ओघात या मूर्तींना आणि त्याची पूजा करणाऱया व्यक्तींना छत द्यायची गरज भासू लागली आणि मंदिर या स्थापत्य प्रकाराचा उदय झाला. देवाचा प्रासाद ही कल्पना डोळ्यासमोर ठेवून देवाच्या वास्तूचे स्वरूप हे बहुमजली असावे या कल्पनेतून मंदिरांना उंच शिखरांचे रूप साकार होऊ लागले. मंदिराच्या विधानात अनेक बदल झाले. त्याचे एक शास्त्र्ाच तयार झाले. हेच ते मंदिर स्थापत्यशास्त्र्ा. यानंतरच्या विकासात मंदिर हे खुद्द ब्रह्मांडाचे प्रतीक बनले. इ.स. १० व्या ते ११ व्या शतकात साकारलेल्या या स्वरूपात मंदिर हे देवाचे शरीर मानले गेले. मंदिर स्थापत्याच्या या विकासात मंदिर हे केंद्रस्थान बनले. मंदिर ही जणू एक संस्थाच बनली आणि त्या आधाराने अनेक लोक आपली उपजीविका करू लागले. संपूर्ण हिंदुस्थानात थोडय़ाफार फरकाने मंदिर स्थापत्याचा विकास असाच झालेला दिसतो.

महाराष्ट्र राज्याच्या बाबतीतसुद्धा हा विकास सहज पाहता येतो. वर उल्लेखिल्याप्रमाणे रामटेक येथील वाकाटक राजांच्या काळातील मंदिरे आज दगडात बांधलेल्या आणि उभ्या असलेल्या प्राचीन मंदिरांचे प्रतिनिधित्व करतात. पण त्याच काळात आणि नंतरही बराच काळ अनेक मंदिरे विटांच्या साहाय्याने बांधली गेली. दगडाच्या तुलनेत वीट हे पटकन नष्ट होणारे माध्यम असल्यामुळे त्यातील फार थोडी आज उत्खननात सापडतात. अशा प्रकारची मंदिरे पैठण, वाशीम (जिल्हा अकोला), तेर (जिल्हा धाराशीव), मांढळ (जिल्हा नागपूर), मुलचेरा (विवेकानंदपूर) (जिल्हा गडचिरोली), नागरा (जिल्हा गोंदिया) इ. ठिकाणी आहेत. यापैकी मांढळ येथे उत्खननात इ.स. ५ व्या शतकातले वाकाटक राजांचे दोन ताम्रपट आणि काही शैव आणि वैष्णव दगडी मूर्ती मिळाल्या. यावरून हे ठिकाण त्या काळातील बरेच महत्त्वाचे केंद्र असावे असे वाटते.

इ.स. ६ व्या शतकातील दगडात बांधलेली मंदिरेसुद्धा विदर्भात सापडलेली आहेत. नागपूरजवळील रामटेक येथे अशी काही मंदिरे आजही पाहावयास मिळतात. यानंतर मात्र दगडात मंदिरे बांधण्याची प्रक्रिया मोठय़ा प्रमाणावर सुरू झाली असावी असे दिसते. महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असलेल्या दगडाचा वापर करून हे बांधकाम करायला सुरुवात झाली. ही सर्व मंदिरे शुष्कसांधी होती म्हणजे त्यामध्ये दगड जोडण्यासाठी कोणतेही साधन वापरले जात नव्हते. शेजारच्या एका दगडातील खाच आणि दुसऱया दगडातील पुढे आणलेला भाग असे एकमेकांमध्ये अडकवून ही एवढी प्रचंड आकाराची मंदिरे बांधली गेली. सह्याद्रीत उपलब्ध असलेला बेसॉल्ट हा अग्निजन्य खडक यासाठी खूपच उपयुक्त ठरला.

ही मंदिरे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सापडतात. अनेकदा ती नद्यांच्या उगमापाशी तर काही वेळेस नद्यांच्या संगमावर आढळतात. बरेचदा ती काही संतपुरुषांशी संबंधित ठिकाणी तर काही वेळेस महत्त्वाच्या व्यापारी केंद्राजवळ असतात. महाराष्ट्रातील दुष्काळी प्रदेशातही प्राचीन काळी खूप मोठय़ा प्रमाणावर मंदिर निर्मिती झालेली दिसते. खरे तर अशा प्रांतांमध्ये मंदिरे बांधणे म्हणजे तत्कालीन रोजगार हमी योजनेचेच उदाहरण होते. अशा प्रकारची मंदिरे धाराशीव, लातूर, संभाजीनगर, सोलापूर या जिह्यांमध्ये प्रामुख्याने आढळतात. पण त्याचबरोबर राज्याच्या इतर भागांतही अशा प्रकारच्या मंदिरांचे समूह आढळतात. उत्कृष्ट शिल्पांनी नटलेली ही मंदिरे म्हणजे महाराष्ट्राचे खऱया अर्थाने अलंकारच आहेत. कोल्हापूर, सातारा, पुणे या जिह्यांमध्येही अशी मंदिरे मोठय़ा प्रमाणात आहेत. महाराष्ट्राची कोल्हापुरातील खुद्द महालक्ष्मीचे मंदिरच मुळात कमीत कमी १००० वर्षे जुने म्हणजे इ.स. च्या ११ व्या शतकातले आहे, पण त्याचा पाया मात्र यापेक्षाही जुना असणार यात शंका नाही. अतिशय भव्य असे हे मंदिर या काळातील वास्तू व शिल्पकलेतील अजोड असा नमुना आहे.

साधारणपणे इ.स. १२ व्या शतकातले एक अतिशय देखणे मंदिर म्हणून खिद्रापूरच्या कोप्पेश्वर मंदिराचा विचार करायला पाहिजे. अतिशय रेखीव शिल्पकाम, भक्कम बांधकाम आणि अवकाशाचे दर्शन घडवणारा भव्य स्वर्गमंडप ही काही या मंदिराची वैशिष्टय़े आहेत. यादव आणि शिलाहार राजांच्या काळातील हे मंदिर म्हणजे महाराष्ट्रातील वस्तू आणि शिल्प यांचा सर्वोत्कृष्ट नमुना आहे. असेच काही उत्कृष्ट मंदिरांचे नमुने मुंबईला अंबरनाथ, सिन्नरला गोंदेश्वर, संभाजीनगरजवळील अन्वा, पुण्याजवळचे भुलेश्वर, गडचिरोलीमधले मार्कंडी, नांदेडजवळचे होट्टल अशा अनेक ठिकाणी पाहायला मिळतात.

महाराष्ट्रातील मंदिरांचे महत्त्व जसे वास्तू आणि शिल्प या प्रकारामुळे दिसते तसेच त्यांचे आध्यात्मिक महत्त्वही अपरंपार आहे. महाराष्ट्रात भीमाशंकर, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर, औंढ्या नागनाथ आणि परळी वैजनाथ अशी पाच ज्योर्तीलिंगे आहेत, अष्टविनायक आहेत आणि ही सगळी ठिकाणे जिथे आहेत तिथे अतिशय प्राचीन काळातील मानवी वस्तीचे अवशेषही पाहायला मिळतात. खरे तर आपल्या पूर्वजांच्या वास्तव्याची स्थळे आता तीर्थक्षेत्रांमध्ये रूपांतरित झाली आहेत असे दिसते. त्यामुळे येथील स्थानिक लोक विविध कारणांनी ती स्थळे सोडून बाहेर पडले असली तरी हे आध्यात्मिक बंध त्यांना परत परत या ठिकाणी आणतात. यामधूनच महाराष्ट्रीय माणसाची अस्मिता आणि ओळख तयार आणि पुढे वृद्धिंगत झालेली दिसते. अशा या प्राचीन हिंदुस्थानी वस्तू आणि शिल्पांनी महाराष्ट्रीय माणसाच्या जीवनात आणि संस्कृतीत अतिशय अविभाज्य असे स्थान मिळवले आहे. हा वैभवशाली वारसा महाराष्ट्रीय माणसाला अनेक प्रलोभने असूनही महाराष्ट्राशी जोडून ठेवतोय हे विसरून चालणार नाही.

(लेखिका पुरातत्वशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)

 

आपली प्रतिक्रिया द्या