सिंधुदुर्गाजवळील मालवणच्या समुद्रकिनारी असलेल्या राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सोमवारी कोसळला. या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच जयदीप आपटे फरार झाल्याचे समजते. जयदीप आपटे याच्या घराला टाळे असून गेल्या दोन दिवसांपासून जयदीप आपटे त्याच्या शेजाऱ्यांना दिसला नसल्याचे समजते.
शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी मेसर्स आर्टिस्टरी कंपनीचे मालक व शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट डॉ. चेतन एस. पाटील यांच्याविरुद्ध मालवण पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता अजित जनकराज पाटील यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम 109, 110, 125, 318, 3(5) आणि सार्वजनिक मालमत्ता अधिनियमाच्या कलम 3 अन्वये याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.
View this post on Instagram
जयदीप आपटे श्रीकांत शिंदे यांचे मित्र
जयदीप आपटे यांना मोठे पुतळे किंवा शिल्प बनवण्याचा कोणताही अनुभव नाही. मात्र फक्त ते मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे मित्र असल्यामुले या अवघ्या तिशीतील नवख्या शिल्पकाराला पुतळ्याचे काम देण्यात आले. मात्र पाच-दहा फुटांचे शिल्प बनवणाऱ्या जयदीपला शिवरायांचा 28 फुटांचा भव्यदिव्य पुतळा तयार करणे झेपले नाही. त्यामुळे पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला. जयदीप आपटे याने राजकोट येथील शिवरायांचे 28 फूट उंच शिल्प घडवण्याआधी फक्त बोटावर मोजता येतील इतकेच पुतळे बनवले होते. तेसुद्धा दीड, तीन, पाच, दहा फूट उंचीचे. त्यामुळे जयदीप आपटे यांना पुतळा उभारण्याचे काम श्रीकांत शिंदे यांच्या शिफारशीने झाल्याचा आरोप होत आहे. शिंदे यांच्यामुळेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नौदलानेही यामध्ये हस्तक्षेप केला नसल्याचे समजते.