मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतूनच 10 लाखांची लाच मागितली, बैठक संपताच अटक

प्रातिनिधिक फोटो

राजस्थानमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रशासकीय सेवेतील 2 बड्या अधिकाऱ्यांना अटक केली आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम मिळालेल्या कंपनीकडून 5 लाख लाखांची लाच घेताना दौसाचे जिल्हाधिकारी पुष्कर मित्तल आणि 10 लाखांची लाच मागितल्याबद्दल बांदीकुईच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी पिंकी मीणा यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांना अटक केल्यानंतर पिंकी मीणा आणि मित्तल यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नरोत्ततम वर्मा यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे. वर्मा यांनी कारवाईनंतर बोलताना सांगितलं की या दोन्ही अधिकाऱ्यांनी रस्ता निर्माणाचे काम मिळालेल्या कंपनीकडे लाच मागितली होती. या कंपनीने पोलिसांत तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर अधिकाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली. पोलीस महासंचालक (लालुप्रवि) बीएल सोनी यांनी सांगितले की ज्या कंपनीकडे या अधिकाऱ्यांनी लाच मागितली होती, त्या कंपनीच्या मालकाने तक्रार केली होती. शेतकऱ्यांकडून जमिनी अधिग्रहीत करून त्या कंपनीला रस्त्याच्या कामासाठी देण्याच्या बदल्यात या अधिकाऱ्यांनी ही लाच मागितली होती. लाच दिल्यास रस्ता बनवताना कोणतही अडचण आली तर ती लगेच दूर करण्याचं आश्वासनही या अधिकाऱ्यांनी दिलं होतं.

धक्कादायक बाब ही आहे की पिंकी मीणा यांनी मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक सुरू असतानाच ही लाच मागितली होती. कंपनीच्या लायजनिंग अधिकाऱ्याकडे 10 लाख रुपये द्या, मी त्याच्याकडून घेईन असं मीणा यांनी ही बैठक सुरू असतानाच सांगितलं होतं. मीणा यांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपताच पोलिसांनी त्यांना अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या