वायू चक्रीवादळामुळे समुद्र किनाऱ्यावर शिंपल्याची चादर, शिंपले गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी

सामना प्रतिनिधी, अलिबाग

दिवेआगर व वेळास खाडी भागाच्या संगमावरील समुद्र किनारी वायू चक्रीवादळामुळे हजारोंच्या संख्येने शिंपल्या किनाऱ्यावर आल्या असल्याने त्यांचा सडा पसरला आहे. शिंपल्या वेचण्यासाठी स्थानिकांनी समुद्र किनाऱ्यावर गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात शिंपले आले असल्याने किनाऱ्यावर शिंपल्याची चादर पसरल्या सारखे दृश्य यामुळे तयार झाले आहे.

समुद्रात आठवड्यापूर्वी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्र खवळलेला होता. त्यामुळे समुद्रातील वातावरणात बदल झाला होता. या बदललेल्या वातावरणामुळे अजस्त्र लाटा समुद्रात व किनाऱ्यावर धडकत होत्या. समुद्रातील उसळणाऱ्या लाटा किनाऱ्यावर येत असल्याने समुद्रातील छोटे जीवजंतू हे समुद्र किनारी लाटाद्वारे आलेले आहेत. वायू चक्रीवादळाच्या तडाख्याने लाटांच्या वेगाने शिंपले हे समुद्र किनारी आलेले आहेत. समुद्रातील वादळाचा जोर कमी झाल्याने समुद्र किनाऱ्यावर शिपल्याचा सडा पसरलेला दिसत आहे.

दिवेआगर समुद्र किनारी गेल्या दोन दिवसांपासून हे शिंपले आले असून पर्यटकांनी व स्थानिकांनी हे वेचून घरी नेले आहेत. समुद्रातून किनाऱ्यावर आलेले हे शिंपले नागरिक घरी नेत असले तरी ते खाण्यासाठी चविष्ट नाहीत. मात्र शोभिवंत वस्तू बनविण्यासाठी या शिपल्यांचा उपयोग होऊ शकतो. समुद्र किनारी पसरलेल्या या शिपल्याने दिवेआगरच्या समुद्राचे सौदर्य खुलून निघाले आहे. समुद्रात झालेल्या वायू चक्रीवादळाचा फटका हा समुद्र किनारी बसला नसला तरी शिंपल्याना मात्र आपला जीव गमवावा लागला आहे.

पावसाळी वातावरण तसेच आता येऊन गेलेले वायू चक्रीवादळ हे वादळ किनाऱ्यावर धडकले नसले तरी वाऱ्याचा वेग हा जास्त होता. त्याचबरोबर पौर्णिमा जवळ असल्याने समुद्राला भरती होती. त्यामुळे शिंपले किनाऱ्यावर आले आहेत. भरतीचे पाणी कमी न झाल्याने शिंपले हे किनाऱ्यावरच राहिले. त्यामुळे किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात शिंपले आले आहेत. असा प्रकार मधूनमधून होत असतो. समुद्रातील हालचाली, पावसाळी वातावरण, वादळामुळे निर्माण झालेला वाऱ्याचा वेग व पाण्यातील करंट यामुळे शिंपले किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात आढळून आलेले आहेत.
– अभयसिंह शिंदे इनामदार, सहायक आयुक्त मत्स्यविभाग