सातव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत ठाण्याचा मयांक चाफेकर प्रथम 

777

swimming-1

 

सामना ऑनलाईन । मालवण 

सातवी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा रविवारी मालवणच्या चिवला बीच किनाऱ्यावर मोठ्या उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेतील वेगवान जलतरण जलतरणपटू म्हणुन ठाणे येथील मयांक चाफेकर याला गौरवण्यात आले. ठाणे, नाशिक, कोल्हापूर, पुणे, नाशिक व नागपुर येथील स्पर्धकांचे वर्चस्व राहिले. २६ जिल्ह्यातील एक हजार स्पर्धक अथांग समुद्रात झेपावत स्पर्धेत सहभागी झाले. २५० हून अधिक महिला-मुलींसह अपंग जलतरणपटूनी स्पर्धेत नोंदवलेला सहभाग कौतुकास्पद होता. समुद्रात पाच किलोमीटर आत पाण्यात झेपावत किनारा गाठणाऱ्या स्पर्धकांचा उत्साह किनारपट्टीवरील नातेवाईक व मित्रपरिवार वाढवताना दिसून येत होते. स्पर्धेच्या निमित्ताने चिवला बीच स्पर्धक, त्यांचे नातेवाईक व मित्रपरिवार यांच्या गर्दीने फुलुन गेले होते.

महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन भाजप नेते माधव भंडारी यांच्या हस्ते समुद्राला श्रीफळ अर्पण करून रविवारी सकाळी ८ वाजता करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू तथा मालवण तहसीलदार विरधवल खाडे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, सागरी तज्ञ् डॉ. सारंग कुलकर्णी, आरोग्य सभापती आप्पा लुडबे, नगरसेवक गणेश कुशे, यतिन खोत,भाजपचे तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, भाऊ सामंत, विजू केनवडेकर, बाबा मोरजकर तसेच जलतरण संघटनेचे मिलिंद राणे, राजेंद्र पालकर, आबा देशमुख किशोर वैद्य, युसुफ भाई, नील लब्दे, या व अन्य मान्यवरांच्या उपस्थित होते.

दरम्यान आमदार विभव नाईक, युवक कॉंग्रेस रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ उपाध्यक्ष बाबा परब, सेना तालुकाप्रमुख बबन शिंदे, बाबी जोगी, संमेश परब, किसान मांजरेकर, रुपेश प्रभू आदिनीही समुद्रात होडीने प्रवास करत स्पर्धकांचा उत्साह वाढवला. तर या स्पर्धेच्या निमित्ताने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र आल्याचे दिसुन आले.

६ वर्षांच्या मुलापासून ते  ८५ वर्ष वयोगटात सहभागी झालेल्या स्पर्धकांचा तसेच महिलांचा उत्साह मोठा होतापाच किलोमीटर, तीन किलोमीटर, दोन व एक किलोमीटर व ५०० मीटर या अंतराच्या ११ विविध गटात स्पर्धा घेण्यात आली. समुद्रात स्पर्धकांच्या सुरक्षेसाठी आयोजक तसेच मच्छीमार यांच्या विविध टीम  होडीतुन स्पर्धकांसोबत होत्या. त्यासह मालवण पालिका, पोलीस प्रशासन, एमटीडीसी, जलक्रीडा व्यावसायिक यांचेही विशेष सहकार्य लाभले. स्पर्धेच्या निमित्ताने हॉटेल उभारणी करणाऱ्या स्थानिकांना रोजगार लाभला तर  मालवणी पदार्थांची चव स्पर्धकांना चाखता आली.

विरधवल खाडे ठरले लक्षवेधी 

आंतरराष्ट्रीय जलतरणपटू तथा मालवण तहसीलदार विरधवल खाडे हे स्पर्धेच्या उदघाटनास सहभागी झाले. मात्र त्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला नाही. असे असले तरी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या स्पर्धकांना व त्यांच्या नातेवाईक यांना खाडे यांना भेटण्याची  उत्सुकता दिसुन आली. खाडे यांच्याकडून जलतर बारकावेही जाणुन घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या