महिला पोलीस कर्मचाऱ्याची इंद्रायणी नदीत उडी, एनडीआरएफकडून दोन दिवसापासून शोध सुरू

अज्ञात कारणातून 20 वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याने गरुड स्तंभ येथून इंद्रायणी नदीत उडी घेतल्याची घटना रविवारी घडली. अनुष्का सुहास केदार असे महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. एनडीआरएफकडून गेले दोन दिवस नदीपात्रात महिलेचा शोध सुरू आहे. मात्र अद्याप महिलेचा शोध लागला नाही. मंगळवारी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे. इंद्रायणी नदीच्या लाभक्षेत्रात आणि पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने नदी पूर आला असून शोधकार्यात यामुळे बाधा येत आहे.

घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहिम हाती घेतली. एनडीआरएफलाही पाचारण करण्यात आले. या शोध मोहिमेत एनडीआरएफच्या 30 जवानांनी 4 बोटीद्वारे इंद्रायणी घाट, आळंदी परिसरात शोध घेतला. यासाठी आळंदी नगरपरिषदकडून 1 बोट, 6 कर्मचारी यांची मदत घेण्यात आली.

आपत्ती व्यवस्थापन संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या 11 जवानांनी बोटद्वारे सोळू, वडगाव, गोलेगाव तसेच इतर इंद्रायणीच्या पात्रात देखील शोध मोहीम राबवली. आळंदी पोलीस स्टेशनमधील 3 अधिकारी आणि 25 पोलीस अंमलदार यांनी इंद्रायणी नदीच्या दोन्ही बाजूने शोध घेण्यास परिश्रम घेत शोध कार्य केले. मात्र सोमवारी सायंकाळपर्यंत बेपत्ता मुलीचा शोध लागला नाही. यामुळे मंगळवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरु करण्यात येणार असल्याचे आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी सांगितले.