सर्च लाइट फिशिंगचा नवा फंडा, जाल्यान गावतेय म्होप म्हावरं

41

सामना ऑनलाईन, उरण

परराज्यातील मच्छीमारांच्या अत्याधुनिक पर्ससीन नेटमुळे अडचणीत सापडलेल्या रायगड जिल्ह्यातील कोळी बांधवांना सर्च लाइट फिशिंगच्या नव्या तंत्रामुळे मोठा आधार मिळाला आहे. सर्च लाइट फिशिंगमुळे कमी वेळेत, कमी खर्चात बंपर मासळी मिळत असून इंधनाचीही बचत होत आहे. त्यामुळे पारंपरिक मासेमारीने नुकसानाच्या वादळात हेलकावे खाणाऱ्या कोळी बांधवांची नाव सर्च लाइट फिशिंगमुळे फायद्याच्या किनाऱ्याला लागली आहे.

खोल समुद्रात मासेमारी करताना मच्छीमारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. खोल समुद्रात जाऊन मासेमारी करताना २० ते २५ दिवसांचा कालावधी लागूनही अनेकदा अपुरी मासळी मिळते. त्यातून वेळही अधिक जात असल्याने खर्चही भरमसाट होतो. मात्र हवी तशी मासळी न मिळाल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान होते. त्यातच गेल्या काही वर्षात परराज्यातील मच्छीमारांच्या अत्याधुनिक मासेमारीमुळे कोकण किनारपट्टीवरील पारंपरिक मासेमारी धोक्यात आली आहे. त्यामुळे पर्ससीन नेट आणि पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांमध्ये समुद्री वादही झाले आहेत. या वादाबरोबरच आर्थिक नुकसानही होत असल्याने अनेक मच्छीमारांवर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.

समस्यांच्या लाटांमध्ये हेलकावे खाणाऱ्या या पारंपरिक मच्छीमारांना मात्र आता सर्च लाइट फिशिंगमुळे आधार मिळाला आहे. या पद्धतीमुळे कमी वेळेत, कमी खर्चात बंपर मासळी मिळत असल्याने मोठा नफा होत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील मच्छीमार या नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करत असल्याचे दिसत आहेत.

काय आहे हे नवे तंत्रज्ञान!
या नव्या पद्धतीमध्ये दोन फिशिंग बोटींचा वापर करून एका फिशिंग बोटीमध्ये ५० केव्ही व्हॅटचा विद्युत जनरेटर ठेवला जातो. या विद्युत जनरेटवर सर्च लाइट लावले जातात. तीन ते पाच किमी अंतराच्या परीघातील समुद्राच्या पृष्ठभागावर विद्युत सर्च लाइटने प्रकाशझोत सोडला जातो. त्यानंतर दुसऱ्या मच्छीमार बोटीवरून प्रकाशझोतातील पृष्ठभागावर गोलाकार जाळी टाकून तेवढा भाग सील केला जातो. या उजेडामुळे विविध प्रकारातील चांगल्या आणि दुय्यम प्रतीची मासळी पकडली जाते.

आपली प्रतिक्रिया द्या