पिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद

82

सामना प्रतिनिधी । हिंगोली

हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथे शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी जिल्हा परिषद शाळा दुसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांना अभावी बंद राहिली. दरम्यान, दैनिक सामनाने अग्रलेखाच्या माध्यमातून या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल नागरिकांनी आभार व्यक्त केले असून प्रशासन देखील खडबडून जागे झाले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ताकतोडा येथे भेट देऊन शेतकरी व नागरिकांनी अडचणी जाणून घेतल्या.

सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन शेतीसह गाव विकणे आहे असा निर्णय घेत प्रशासनामार्फत राज्य शासन व मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली. तसेच मागणी मान्य न झाल्यास 19 जुलै पासून शाळा ग्रामपंचायत कार्यालय तलाठी सज्जा बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार कालपासून दोन दिवस झाले तरीही एकही विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत फिरकला नाही. दरम्यान ‘शेतकऱ्यांनी जगायचे कसे- गाव विकणे आहे’ हा अग्रलेख दैनिक ‘सामना’ मध्ये प्रसिद्ध झाल्यावर हिंगोली जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली.

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी हे आजारी असल्यामुळे इच्छा असूनही ताकतोडा येथे जाऊ शकले नाहीत. मात्र, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार जीवककुमार वाघमारे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी गावात भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पिक विमा साठी शाळा बंद असल्याचा प्रकाराबाबत चौकशी करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी दैनिक ‘सामना’ प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

शाळा बंद असून देखील जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के हे बेफिकीर असल्याचे दिसून आले. सोनटक्के यांचा भ्रमणध्वनी बंद होता. पिक विमा हा जिल्हा परिषदेच्या अधिकाराचा विषय नसला तरीही नागरिकांचे म्हणणे जाणून घेण्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे सीईओ तुमोड यांनी सांगितले. ताकतोडा येथील शेतमजूर लक्ष्मण मगर यांनी तीन वर्षापासून सतत दुष्काळ असल्यामुळे शेतमजुरांना कुठलाही रोजगार मिळत नाही. यासाठी शासनाने मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी केली. तर मागील वर्षी शेतजमीन विकून मुलीचे लग्न केले. माझ्यावर बँक व खासगी सावकाराचे कर्ज कायम असल्याची व्यथा शेतकरी माणिक सावके यांनी बोलून दाखवली. शासनाने दोन वर्षापूर्वी कर्जमाफी जाहीर केली परंतु अद्यापपर्यंत लाभ मिळाला नाही. तसेच पिक विमा भरून देखील नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे पिक विमा मीळेपर्यंत आमची मुले शाळेत जाणार नाहीत असा निर्धार शेतकरी जनार्दन साळुंके यांनी बोलून दाखविला.

प्रशासनाने भेटी दिल्या तरीही ही मागणी सोडविण्यासाठी गतिमान हालचाली होत नसल्याचे चित्र आहे.

आपली प्रतिक्रिया द्या