श्रीनगरात सीआरपीएफच्या तळावर दहशतवादी हल्ला

17

सामना ऑनलाईन, श्रीनगर

जम्मू-कश्मीरातील स्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे. सुंजवा येथील लष्करी तळावरील हल्ल्याला काही तास उलटत नाहीत तोच आज पाकिस्तानी दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील सीआरपीएफच्या तळास टार्गेट केले. बेछूट गोळीबार करीत हल्ला केला. यात एक जवान शहीद झाला आहे. ‘लष्कर-ए-तोयबा’चे हे दहशतवादी सीआरपीएफजवळील इमारतीत लपून बसले असून, येथे रात्री उशिरापर्यंत चकमक सुरू होती.

शनिवारी सुंजवा येथील लष्करी तळावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. येथे तब्बल ३० तास ऑपरेशन सुरू होते. चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. सुंजवाप्रमाणेच श्रीनगरातील करन नगर परिसरातील केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या तळावर सोमवारी पहाटे ४.३०च्या सुमारास लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी घुसण्याच्या तयारीत होते. तळावर आतमध्ये घुसण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. मात्र, जवानांनी जोरदार गोळीबार केला. यावेळी चकमक झडली. त्यात एक जवान शहीद झाला.

तळाशेजारील इमारतीत दहशतवादी लपले

जवानांनी जोरदार गोळीबार केल्यानंतर दहशतवादी पळाले आणि सीआरपीएफ तळाशेजारील निवासी इमारतीत घुसले. किमान दोन दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. जवानांनी या इमारतीला घेरले असून, उशीरापर्यंत चकमक सुरू होती.

पाकिस्तान मूर्खांच्या नंदनवनात राहात आहे – अब्दुल्ला

कश्मीरचा ताबा घेऊ असे पाकिस्तानला वाटत असेल तर, ते मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहे. कश्मीर हे हिंदुस्थानचेच होते, आहे आणि राहणार. पाकने कश्मीरवर डोळा ठेवण्यापेक्षा स्वतःच्या भावितव्याचा विचार करावा, अशा शब्दात नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी पाकला फटकारले. यावेळी अब्दुल्ला यांनी युद्ध नको तर शांततापूर्ण तोडगा हाच पर्याय असल्याचे सांगितले. दहशतवादी हल्ले वाढले तर, परिस्थिती कठीण होईल. पाकसाठी जास्त कठीण असेल. केंद्र सरकारनेही यापुढील काय पावले उचलावी याचा विचार केला पाहिजे, असे अब्दुल्ला म्हणाले.

एसएमएचएस हॉस्पिटलनजीक हल्ला

गेल्या आठवडय़ात दहशतवाद्यांनी श्रीनगरातील ‘एसएमएचएस’ या सरकारी हॉस्पिटलवर दिवसाढवळ्या हल्ला करून कैदी असलेला ‘तोयबा’चा दहशतवादी नाविद जट ऊर्फ अबू हान्झाला याला पळवून नेले होते. सीआरपीएफचा कॅम्प या हॉस्पिटलजवळच  आहे. याच परिसराला दहशतवाद्यांनी पुन्हा टार्गेट केले आहे.

कारवाईस विरोध; जवानांवर दगडफेक

जवानांनी इमारतीला घेरल्यानंतर माथेफिरू तरुणांनी दगडफेक केली. जवानांनी सुरू केलेल्या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांना वाचविण्यासाठी ही दगडफेक करण्यात आली. मात्र, जवानांनी दगडफेक करणाऱया माथेफिरू तरुणांना रोखले आणि दहशतवाद्यांविरुद्धचे ऑपरेशन सुरू केले.

आपली प्रतिक्रिया द्या