खरंच ‘टॅटुनी’ असेल?

37

[email protected]

माणूस नावाच्या प्राण्याला एकमेव प्रगत जीवसृष्टी असलेली पृथ्वी सहीसलामत ठेवण्याचं आव्हान किंवा कर्तव्य पेलता आलेलं नसलं तरी वैज्ञानिक उपकरणांच्या आधारे अवकाशातील ‘दुसरी’ पृथ्वी शोधण्याची आस काही कमी होणारी नाही. नासाची ‘केपलर’ ही अवकाशस्थ दुर्बिण त्यादृष्टीने दूर अंतराळातील विविध ताऱ्यांकडे नजर रोखून असते. एखाद्या ताऱयाभोवती ग्रहमाला सापडल्याच्या बातम्या प्रसिद्ध होतात. त्या खऱ्याच असतात, पण त्या ग्रहांमध्ये पृथ्वीसारखं जीवसृष्टीचं संगोपन करण्याची क्षमता अजून तरी आढळलेली नाही.

आतासुद्धा आपल्या सूर्यमालेपासून सुमारे ४० प्रकाशवर्षे अंतरावर पृथ्वीसदृश ग्रह आढळला असून त्यावर पृथ्वीसारखं वातावरण आणि मुख्यत्वे पाणी असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गुरूच्या आकाराचा एक अतिउष्ण असा एक ग्रह मध्यंतरी ‘सापडला’ होता, पण त्यावर सजीव असण्याची शक्यता शून्यवत आहे. त्याचं वर्णन सुपर-अर्थ (महापृथ्वी) असं केलं गेलं होतं. आणखी एक ग्रह त्याच्या लालखुजा या थंड ताऱ्यासमोरून ‘अधिक्रमण’ करताना दिसला. त्यामुळे ताऱ्याकडून येणारा काही प्रकाश रोखला गेला. त्याचे मोजमाप करून या ग्रहाचा आकार पृथ्वीच्या दीडपट असल्याचं ध्यानात आलं.

साध्या वातावरणाचा अभ्यास करताना या उष्ण ग्रहावर असलेलं पाणी वाफेच्या स्वरूपात असेल असं म्हटलं जातं. अर्थातच तिथे जीवसृष्टी वगैरे असणं दुरापास्तच आहे. पृथ्वीवरच्या सजीवांना जगण्यासाठी लाभणारं वातावरण असलेला ग्रह सापडत नाही तोपर्यंत नुसत्या आकाराने पृथ्वी गोलाएवढे असलेले ग्रह सापडण्याने फारसा फरक पडत नाही.

आता दोन ताऱयांभोवती फिरणारा ‘अगदी पृथ्वीसारखा’ ग्रह केपलर दुर्बिणीच्या निरीक्षणातून दिसला आहे. द्वैत तारे म्हणजे एकाच गुरुत्वमध्याभोवती फिरणारे दोन तारे. अशा जोडताऱयांच्या भोवतालीसुद्धा ग्रहमाला असू शकते हे सिद्ध झालं आहे. मात्र अशा द्वैती ताऱयांभोवतीचे ग्रह आकाराने प्रचंड आणि आपल्या गुरूसारखे वायुरूप असणारे आहेत. पृथ्वी-मंगळासारखे वसाहतयोग्य ग्रह आजवर द्वैती ताऱयांभोवती सापडले नव्हते.

केपलर अवकाश दुर्बिणीच्या नव्या संशोधनात एका जोडताऱ्याभोवती पृथ्वीसारखाच ग्रह सापडल्याने तिथे सजीव निर्मितीला अनुकूल असं वातावरण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अमेरिकेतल्या प्रिन्स्टन विद्यापीठाचे मॅक्स पॉप यांना असे वाटले की, जोडताऱ्याभोवतीही जीवसृष्टीचा सांभाळ करणारा ग्रह असू शकेल. आता दोन सूर्य असलेल्या ग्रहावर सतत प्रखर प्रकाश पडत असेल तर जीवसृष्टीची वाढ कशी होणार हा प्रश्नच असतो. कारण जीवसृष्टीला प्रकाश आणि अंधाराची सारखीच गरज असते. मात्र या दोन्ही ताऱ्यांची उगवती आणि मावळतीच्या वेळेत फार फरक नसेल तर अगदी निम्म्या दिवसाची नाही तरी पृथ्वीच्या तुलनेत सात-आठ तासांची ‘रात्र’ त्या ग्रहाला मिळू शकते आणि पुरेसा पाणीपुरवठा असेल तर सजीवाची निर्मिती होऊ शकते.

एकपेशीय सजीव अनेक ग्रहांवर असू शकतात, पण माणसाइतका प्रगत सजीव असायला अनेक घटकांची अचूक जुळणी होणे गरजेचे असते. त्यातला एक जरी नसला तरी जिवोत्पत्तीमध्ये आपत्ती येऊ शकते. आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा प्रकारचा सजीव विश्वात अन्य कुठे नसेल असे नाही; परंतु त्याची रचना हॉलीवूडच्या ‘स्टार वॉर्स’ किंवा ‘एलियन’मधल्या सजीवासारखीच असेल असे सांगता येत नाही. माणसाने त्याच्या कल्पनेतून भूत, राक्षस निर्माण केले तसेच ‘एलियन’ही केले आहेत; परंतु प्रत्यक्षात तो कोणीतरी सजीव कसा असेल हे विराट विश्वातील गूढरम्य कुतूहलच आहे. स्टार वॉर्स चित्रपटात दोन सूर्य आणि तीन चंद्र असलेल्या ‘टॅटुनी’ ग्रहाचं चित्रण आहे. प्रत्यक्षात तसा एखादा असेल? ठाऊक नाही!

आपली प्रतिक्रिया द्या