‘टीम इंडिया’साठी आता ‘जिंका किंवा मरा’!

हिंदुस्थान व ऑस्ट्रेलियादरम्यानचा दुसरा टी-20 क्रिकेट सामना शुक्रवारी नागपूरमध्ये रंगणार आहे. पाहुण्या ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे यजमान हिंदुस्थानला मालिकेतील आव्हान राखण्यासाठी उद्या जिंकावेच लागणार आहे. उभय संघ प्रथमच या स्टेडियमवर भिडणार आहे.

हिंदुस्थानला मोहालीतील सलामीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून हरवले होते. त्यामुळे मालिकेत बरोबरी साधण्यासाठी रोहित शर्माच्या सेनेला सर्वच आघाडय़ांवर सरस खेळ करावा लागणार आहे. नागपूरमध्ये ‘टीम इंडिया’ला आतापर्यंत संमिश्र यश मिळाले आहे. या मैदानावर झालेल्या चार टी-20 लढतींत हिंदुस्थाने दोन विजय मिळवले, तर दोनदा पराभवाचे तोंड पाहिले आहे.

पावसाची शक्यता

मागील काही दिवसांपासून नागपूरमध्ये पाऊस पडत आहे. वेधशाळेने उद्या सामन्याच्या वेळीही पावसाची शक्यता वर्तवली आहे. पावसामुळे दुसरा टी-20 सामना होऊ शकला नाही तर टीम इंडियाचे मालिका विजयाचे स्वप्न भंगणार आहे. कारण त्यानंतर हिंदुस्थानला तिसरा सामना जिंकून केवळ मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी असेल. नागपूरमध्ये तीन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होत आहे. 45 हजार तिकिटे विकली गेलेली आहेत. पावसामुळे हा सामना झाला नाही तर क्रिकेटप्रेमींचा हिरमोड होणार आहे.

हिंदुस्थानी संघात दोन बदल होणार?

हिंदुस्थानच्या फलंदाजीत बदल होण्याची शक्यता वाटत नाही, मात्र गोलंदाजीत रोहित शर्माला बदल करावे लागणार आहेत. दोनशेहून अधिक धावांचाही गोलंदाजांना बचाव करता येत नसेल तर टीम इंडियासाठी ही चिंतेची बाब होय. फिरकीपटू युजवेंद्र चहलने अलीकडे निराशा केलेली आहे. याचबरोबर वेगवान गोलंदाज उमेश यादवने नुकतेच संघात पुनरागमन केलेले आहे, मात्र जसप्रीत बुमराहसाठी उमेशला संघाबाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे. याचबरोबर युजवेंद्रऐवजी अनुभवी रविचंद्रन अश्विनला संघात स्थान मिळण्याची शक्यता बळावली आहे. रवींद्र जाडेजा संघात नसल्याने अश्विनमुळे फलंदाजीतही ताकद वाढणार आहे.