‘बापजन्म’चा दुसरा टीझर प्रदर्शित

सामना ऑनलाईन । मुंबई

एका बापाची गोष्ट सांगणारा बापजन्म या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. त्यात भास्कर पंडित नावाच्या एका बापाची कथा दिसून आली. पण एकट्यानेच मरणाची भाषा करणारा भास्कर पंडित नेमका एकटा का राहतो, त्याची मुलं नेमकी कुठे असतात.. असे अनेक प्रश्न पहिल्या टीझरने मांडले होते. आता त्या प्रश्नांची उत्तरं देणारा बापजन्म या चित्रपटाचा दुसरा टीझर प्रदर्शित झाला आहे.

या टीझरमध्ये भास्करला दोन मुलं असल्याचं स्पष्ट होतंय. पण, मग असं काय झालंय ज्यामुळे त्याची मुलं त्याला दुरावली आहेत. त्यांना भेटायला भास्करची प्रचंड तगमग सुरू आहे. एका बापाची तगमग त्याच्या मुलांना कळेल का? की अखेर एकटेपणाचीच सोबत घेऊन भास्कर मृत्युला सामोरा जाईल? हे असे अनेक प्रश्न टीझर पाहताना मनात उभे राहतात. अर्थात याचं उत्तर ट्रेलरच देऊ शकेल.

या चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया, सुमतिलाल शाह आणि सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर प्रोडक्शन्स यांनी केली आहे. कास्टिंग काउच या वेबसीरिजच्या माध्यमातून लोकप्रिय झालेला अभिनेता आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. येत्या २९ सप्टेंबर रोजी ‘बापजन्म’ प्रदर्शित होत आहे.

पाहा दुसरा टीझर-