मुंबईतील संरक्षक भिंतींची कामे तत्काळ सुरू करणार

24

सामना प्रतिनिधी । मुंबई

पावसाळय़ात दरडी कोसळून डोंगरांच्या पायथ्याशी राहणाऱया झोपडपट्टय़ा तसेच चाळींचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होते. त्याचप्रमाणे जीवितहानीही होते हे लक्षात घेता मुंबई शहर तसेच उपनगरात संरक्षक भिंती बांधण्याचे काम म्हाडाकडून तत्काळ सुरू करण्यासाठी शॉर्ट टेंडर नोटीस काढण्यात येईल, असे आश्वासन गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानसभेत दिले.

विधानसभा सदस्य रमेश लटके यांनी याप्रश्नी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने मुंबई पूर्व व पश्चिम विभागातील डोंगर उतारावर झोपडपट्टय़ा व चाळींवर पावसाळय़ात दरड कोसळून होणाऱया अपघातास प्रतिबंध घालण्याकरिता संरक्षक भिंती बांधण्यात येतात. ही कामे जिल्हा उपनिबंधक यांच्या अखत्यारीत येणाऱया मजूर सहकारी संस्थाकरिता काम देणे बंधनकारक असताना म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱयांनी सर्व नियम डावलून एकाच कंत्राटदाराला ही कामे दिली जात जातात तसेच कामास विलंब होत असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना राज्यमंत्री वायकर यांनी उपनगरातील संरक्षक भिंतीचे काम तत्काळ सुरू व्हावे व जनतेला दिलासा देण्यासाठी सात अथवा दहा दिवसांचे शॉर्ट टेंडर काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे एकाच कंत्राटदाराला काम देण्याचा निर्णय कुणी घेतला त्याची चौकशी करणार का, असा प्रश्न विधानसभा सदस्य नसीम खान यांनी उपस्थित केला. याचीही चौकशी करण्यात येईल, असे आश्वासनही वायकर यांनी दिले.

  • संरक्षक भिंतींची कामे रखडल्याने उद्या दरड कोसळून नुकासन झाल्यास मनुष्यहानी झाल्यावर संबंधित कंत्राटदार तसेच अधिकाऱयांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का, असा सवाल शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी केला. तर रमेश लटके यांनी एकाच कंत्राटदाराला कामे दिल्याने 750 मजूर सहकारी संस्था व अभियंत्यांचा रोजगार हिरावून घेतला जात असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणली.
आपली प्रतिक्रिया द्या