‘शिवकार्य’चे बळवंत गडावर भरपावसात बीजारोपण

25

सामना प्रतिनिधी, नाशिक

शिवका¬र्य गडकोट संवर्धन संस्थेने रविवारी भरपावसात बळवंत गडावर ४९वी गड संवर्धन मोहीम राबविली. गडाच्या माथ्यावरील ओसाड जागेवर देशी वृक्षांच्या बियांचे अभ्यासपूर्ण पद्धतीने रोपण करण्यात आले.

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षी पावसाळ्यात किल्ल्यांवर बीजारोपण, वृक्षारोपण मोहिमा राबविल्या जातात. गडकिल्ल्यांच्या संवर्धन कार्यात पर्यावरण रक्षण हाही महत्वाचा भाग असून, यासाठी संस्थेच्या माध्यमातून वर्षभर बियांचे संकलन केले जाते, कमी पावसावर येणारी रोपे तयार केली जातात. गड-किल्ल्यांवर कुठल्या ठिकाणी बीजारोपण, वृक्षारोपण केले पाहिजे याचे संवर्धकांनी प्रशिक्षण घेतले असल्याने अभ्यासपूर्ण पद्धतीने हे काम केले जात आहे. यंदा बीजारोपण व वृक्षारोपणासाठी बळवंत गडाची निवड करून रविवारी माथ्याच्या ओसाड जागेवर सिताफळे, मूळ अशोक या बिजांचे रोपण करण्यात आले.

नाशिक गॅझेटियरमध्ये या गडाचा उल्लेख नाही. किल्ल्यावर ८ फूट रुंदीची मोडकळीस आलेली तटबंदी आहे, नैऋत्येला शिवकालीन कोरीव टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. हा टेहळणीचा किल्ला म्हणून ओळखला जातो. यावेळी दुर्गसंवर्धकांनी किल्ल्याच्या वास्तूंचे मोजमाप करीत संकल्पित चित्रे तयार केली.

या मोहिमेत संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ, शिवाजी गाडे, डॉ. अजय कापडणीस, संदीप भानोसे, आर. आर. कुलकर्णी, यशवंत धांडे, शामराव कुलथे, प्रमोद चौहान, हर्षल पवार, पवन माळवे, प्रितम भामरे, सागर बोडके, विष्णू खैरनार, मनोज अहिरे, रतनकुमार भावसार, मिथील शहा सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या