ममतांच्या पक्षाचे आमदार काढणार ‘माफी यात्रा’

11


सामना ऑनलाईन, कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे चिंताग्रस्त झाली आहे. तिथल्या जनतेचा विश्वास कायम रहावा यासाठी ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या आमदारांना राज्यभर फिरून ‘माफी यात्रा’ काढण्याचे आदेश दिले आहेत. आमदारांनी विनम्रतेने लोकांपर्यंत पोहचावे आणि त्यांना आपल्या काय चुका झाल्या ते विचारावे असे आदेश ममता बॅनर्जींनी दिले आहे. चुका कळाल्यानंतर त्याबद्दल माफी मागण्यासही त्यांनी सांगितले आहे.

2021 साली पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी पाहता तृणमूल काँग्रेसच्या उरात धडकी भरली आहे. आपला बालेकिल्ला ढासळू नये यासाठी तृणमूल काँग्रेसने आतापासूनच प्रयत्न करायला सुरूवात केली आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणूनच या माफी यात्रेकडे पाहिले जात आहे. तृणमूल काँग्रेसच्या आमदारांसोबत ममता बॅनर्जी यांनी एक बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी पक्षापासून दुरावलेल्यांना पुन्हा आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करा असे आदेश दिले आहेत.

यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या हफ्ता वसुलीविरोधात कठोर भुमिका घेतली होती. सगळ्या नगरसेवकांनी लोकांकडून घेतलेले पैसे परत करावेत असे त्यांनी आदेश दिले होते. पश्चिम बंगालमध्ये सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांकडून ठराविक रक्कम कट कमिशन किंवा हफ्ता म्हणून घेतली जात होती. या हफ्तेखोरीविरोधात तिथली जनता आक्रमक झाली असून यामुळे तृणमूल काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गाव सोडून पलायन करायला सुरूवात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या