सरकारी कामगार अधिकारी म्हणून मुकुंद होन यांची निवड, एमपीएससीच्या मुलाखतीत राज्यात प्रथम

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील माजी सरपंच केशवराव होन यांचे चिरंजीव मुकुंद केशवराव होन सरकारी कामगार अधिकारी महाराष्ट्र राज्य पदी निवड करण्यात आली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून त्यांनी हे यश संपादन केले आहे. राज्यामध्ये त्यांनी 200वा क्रमांक मिळवला आहे. एम पी एस सी च्या या परीक्षेत मुलाखतीमध्ये राज्यात प्रथम क्रमांकाचे मार्क त्यांनी मिळवले आहे.

2 लाख 40 हजार स्पर्धा परीक्षार्थींनी MPSC राज्यसेवा परीक्षा दिली होती. त्यातील 405 यशस्वी उमेदवाराची निवड करण्यात आली आहे. त्यात कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील मुकुंद केशवराव होन यांनी यश संपादन केले आहे. मिळवलेल्या यशाचे सर्व श्रेय त्यांनी आपले कुटुंब, वडील केशवराव होन, आई सुलोचना होन, आजी शांताबाई होन, बंधू विजय होन, प्रशांत होन, मित्र परिवार आणि मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांना दिले आहे. प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी मौनगिरी महर्षी विद्या मंदिर येथे पूर्ण केले होते, तर उच्च शिक्षण त्यांनी पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालयात पूर्ण केले.

जिद्द आणि चिकाटी ठेवून त्यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न उराशी बाळगल्याने आणि पुणे येथेच त्यांनी एमपीएससीचा अभ्यास करायला सुरुवात केली. अखेर काल त्यांना हे यश मिळाले असून त्यांची सरकारी कामगार अधिकारी म्हणून निवड झाली. त्यांच्या यशाची वार्ता कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे परिसरात समजतात अनेकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.